
शिर्डी (Shirdi) : सावळीविहीर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या वीस वर्षांपासून तीनतेरा वाजले आहेत. काम अर्धवट सोडून यापूर्वी दोन ठेकेदार पळून गेले. तिसरा ठेकेदार नक्की करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र रिटेंडरची ही तिसरी प्रक्रिया या बैठकीत पूर्ण होऊ शकली नाही. दोन ठेकेदार कंपन्यांनी टेंडर भरले होते. त्यातील एक कंपनी पात्रतेचे निकष पूर्ण करू न शकल्याने बाद झाली. आता उर्वरित कंपनीची टेंडर उघडून निर्णय व्हायला आणखी सात ते आठ दिवस लागतील.
पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामासाठी ७०१ कोटी रुपये खर्चाची निविदा जाहीर करण्यात आली. मात्र देशभरातील एकाही नामवंत कंपनीने या कामात रुची दाखविली नाही. केवळ दोन कंपन्यांनी टेंडर भरली. त्यात अहिल्यानगर बाह्यवळण रस्त्याचे काम करणाऱ्या जयश्री कंपनीचा समावेश आहे. या कंपनीची टेंडर पात्रतेच्या निकषात बसते. त्यामुळे हे टेंडर उघडून पुढील निर्णय दिल्लीतले राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी घेतील. त्यासाठी आणखी सात ते आठ दिवस लागू शकतील. या पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या रस्त्यात जवळपास पंचवीस किलोमीटर लांबीच्या अंतरात एक, तर हॉटेल किंवा वेगवेगळी दुकाने आहेत. त्यामुळे हे दुकानदार आणि हॉटेल मालक रस्त्याची ड्रेनेज खोदाई आणि साईटपट्ट्यांचे काम करण्यात वारंवार अडथळे आणतात. राजकीय नेत्यांना साकडे घालतात. त्यामुळे काम करणे मुश्कील होते, असा आजवरच्या ठेकेदार कंपन्यांचा अनुभव लक्षात घेऊन नव्या ठेकेदार कंपन्या हे काम करायला बिचकतात. त्याचा परिणाम म्हणून तिसऱ्या रिटेंडर प्रक्रियेत केवळ दोन कंपन्या सहभागी झाल्या. त्यातही एक बाद ठरली.
यापूर्वी जेथे गावे आहेत आणि पावसाचे पाणी साठते अशा भागात काँक्रिटीकरण आणि उर्वरित भागात डांबरीकरण, असे या रस्त्याच्या कामाचे स्वरूप होते. आता या तिसऱ्या निविदेत मात्र सरसकट डांबरीकरण आहे. दोन्ही बाजूंनी दुकाने आणि हॉटेलांचे उंचवटे आणि राष्ट्रीय महामार्गाला एखाद्या नाल्याचे स्वरूप, असे चित्र पावसाळ्यात येथे पहायला मिळते. या अंतरात काँक्रिटीकरणाचा समावेश असता, तर कदाचित हा रस्ता भविष्यात जरा बरा झाला असता. नाशिक ते सावळीविहीर या अंतरातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या लोकसंख्येच्या गावांत सरसकट उड्डाणपूल आहेत. त्यावेळी या उड्डाणपुलांना जेथे जेथे विरोध झाला. तेथे पोलिस संरक्षण घेऊन हे काम पूर्णत्वास नेण्यात आले. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने कमालीचा सुलभ झाला. अपघाताचे सत्र थांबले. आता कमीतकमी वेळात सावळीविहीर ते नाशिक हे अंतर पार करता येते.
अपघातांच्या मालिकांची टांगती तलवार
सावळीविहीर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर सावळीविहीर, शिर्डी, राहाता, बाभळेश्वर, कोल्हार आणि राहुरी येथे उड्डाणपूल गरजेचे होते. मात्र त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होईल, या कारणास्तव उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाचे पर्याय ठेवलेले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून हा रस्ता भविष्यात डांबरी झाला तरीही स्थानिक आणि परराज्यांतील वाहतुकीची सरमिसळ कायम राहील. अपघातांच्या मालिकांची टांगती तलवार देखील कायम राहील.