
मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या के.ई.एम. रुग्णालय परिसरातील डीन बंगल्यासह जुन्या तीन इमारती आणि भांडारगृह पाडून तिथे केईएम रुग्णालयाच्या शतकपूर्ती वर्षांची आठवण म्हणून ३२ मजली शताब्दी अर्थात सेंटेनरी टॉवर उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेकडून टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.
के. ई. एम. रुग्णालयाच्या आवारात सीओ वन, सीओ टू, सीओ तीन आणि भांडारगृह अशा चार जुन्या इमारती आहेत. या इमारती पाडून तेथील उपलब्ध सुमारे ४००० चौरस मीटर जागेवर रुग्णालयाची नवीन तंत्रज्ञान / अद्ययावत उपकरणासहित ३०० बेड व २२ ऑपरेशन थिएटर सह ३२ मजली इमारत बांधण्यासाठी महापालिकेच्या वास्तुविशारद विभागामार्फत आराखडा तयार करण्यात आला आहे. के. ई. एम. रुग्णालयात दरवर्षी सुमारे २५ लाख बाह्य रुग्ण उपचार घेतात त्यामुळे रुग्णालयाचे बेड नेहमीच फुल्ल असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेता मध्य मुंबईतील या महत्वाच्या व मोठ्या रुग्णालयात येणाऱ्या शतकपूर्ती वर्षात सुसज्ज ३२ मजली नवीन इमारत बांधण्यासाठी तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रुग्णालय येत्या वर्षी शतकपूर्ती महोत्सव साजरा करीत आहे. सध्या रुग्णालयातील विविध इमारतींमध्ये २२०० बेड विखुरलेले आहेत. या जुन्या इमारती हेरीटेजमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान / अद्ययावत उपकरणे बसविण्यासाठी इमारतीमध्ये संरचनात्मक बदल करता येत नाही, असे शिरसाट यांनी निवेदनात म्हटले आहे. या शताब्दी रुग्णालय अर्थात सेंटेनरी टॉवरचा विकास पूर्वी डीन बंगला वगळून अन्य बांधकामे पाडून करण्यात येणार होता. पण महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी आणि अतिरिक्त डॉ विपीन शर्मा यांच्यासमवेत झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत डीन बंगलोसह इतर जुनी बांधकामे तोडून नवीन ३२ मजली इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेऊन त्याचा विकास आराखडा तयार केला जात आहे.
यात पूर्वी डीन बंगल्याचा समावेश नव्हता, परंतु आता डीन बंगल्याचा समावेश केल्यामुळे याचा आराखडा बनवण्याच्या कामाला विलंब झाला. याच डीन बंगल्याचे बांधकाम तोडले जावू नये अशी मागणी उबाठा शिवसेनेचे सचिन पडवळ यांनी निवेदनाद्वार केली होती, तसेच याला डीन यांचा विरोध असल्याने डीन निवासस्थान या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर दिले जावे अशी सूचना करण्यात आली असल्याची माहिती मिळते. केईएम रुग्णालयात सध्या कर्मचारी भवनच्या कामाला कार्यादेशनुसार सुरुवात झाली आहे.