
मुंबई (Mumbai) : कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी सर्व नियम पायदळी तुडवून नियमबाह्य पद्धतीने खरेदी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला. यावेळी त्यांनी मंत्री मुंडे यांनी २७५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा घणाघाती आरोप करत खळबळ उडवून दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी एकेक खरेदीची माहिती देत मुंडे यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला.
यावेळी दमानिया म्हणाल्या, ‘‘धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना नियमांना बगल दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बेकायदेशीरपणे सह्या घेऊन अनेक योजना राबविल्या. चुकीच्या पद्धती निविदा काढून कंत्राटाचे वाटप केले. त्यामुळे भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन चौकशी करावी,’’ अशी मागणी त्यांनी केली. त्या म्हणाल्या, ‘‘केंद्र सरकारने २०१६ मध्ये शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतराच्या (डीबीटी) माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते. राज्य सरकारला हे आदेश बंधनकारक होते. मात्र, तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने या आदेशाला बगल देत शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसविले. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी केल्या, ’’ असा आरोप त्यांनी केला.
दमानिया म्हणाल्या, की नॅनो युरियाची ५०० मिलीच्या ९२ रुपयाला मिळणाऱ्या बाटलीची २२० रुपयांना खरेदी केली. एकूण १९ लाख ६८ हजार ४०८ बाटल्या दुप्पटीपेक्षा जास्त दराने खरेदी केल्या. नॅनो डीएपीची ५०० मिलीची बाटली २६९ रुपयांना मिळते. मात्र कृषी विभागाने १९ लाख ५७ हजार ४३८ बाटल्यांची प्रत्येकी ५९० रुपयांनी खरेदी केली. वरील दोन्ही खरेदीत ८८ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘बॅटरी स्पेअर’ पंप ‘एमएआयडी’च्या संकेतस्थळावर २,४५० रुपयाला मिळतो, तो २,९४६ रुपयांना विकला जातो तर निविदेच्या माध्यमातून त्याची ३,४२६ रुपयांना विक्री करण्यात आली. एका बॅटरीस्पेअर पंपामागे १ हजार रुपये कमावण्यात आले. या योजनेसाठी ५ लाखाहून अधिक लाभार्थी होणार होते. मात्र लाभार्थी कमी करून २ लाख ३६ हजार ४२७ बॅटरी स्पेअरची खरेदी करण्यात आली. गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस आणि सोयीबीनचे नुकसान होते. त्यासाठी मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचं पेटंट असलेले औषध आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यानंतर ते स्वस्त मिळते. बाजारात याचा दर ८१७ इतका आहे. मुंडेंनी ते १,२७५ रुपयांना विकत घेतले. एकूण १ लाख ९६ हजार ४४१ किलो औषधाची खरेदी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी १२ मार्चला राज्य सरकारने एक शासन निर्णय काढला. यात कृषी आयुक्तांना शेतीशी संबंधित गोष्टींच्या खरेदीसाठी नियंत्रण अधिकारी करण्यात आले होते. मात्र तत्कालीन कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी खरेदीची योजना राबविणे चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिले होते, असेही दमानिया यांनी सांगितले.
५७७ रुपयांची पिशवी १,२५० रुपयांना
कृषी विभागाने ६ लाख १८ हजार कॉटन स्टोरेज बॅगची खरेदी केली. काही दिवसांपूर्वी आयसीएआय नावाच्या संस्थेने प्रत्येकी ५७७ रुपये प्रमाणे २० पिशव्यांची खरेदी केली. मात्र कृषी विभागाने टेंडर काढून याच पिशव्यांची प्रत्येकी १,२५० रुपयांना खरेदी केली. एकूण ३४२ कोटीच्या निविदेमध्ये १६० कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे दमानिया यांनी सांगितले.