
पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन होऊन सहा वर्षे उलटून गेली. मात्र, अद्यापही आयुक्तालयाचे कामकाज भाड्याच्याच इमारतीत सुरू आहे.
अनेक दिवसांपासून हक्काच्या इमारतीची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे. चिखलीतील ३.३९ हेक्टर जागा ताब्यात मिळाली असून, लवकरच येथे पोलिस आयुक्तालयाची भव्य सहा मजली अंडाकृती इमारत उभी राहणार आहे. मात्र, आता या इमारतीच्या भूमिपूजनाला नेमका मुहूर्त कधी लागणार? याची प्रतीक्षा आहे.
१५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले. सुरुवातीला आयुक्तालयाचे कामकाज चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये सुरू करण्यात आले. येथील जागा अपुरी असल्याने अधिकाऱ्यांची कार्यालयेही छोटी होती. दरम्यान, ९ जानेवारी २०१९ रोजी चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळेत आयुक्तालय स्थलांतरित करण्यात आले. ही जागाही कामकाजासाठी अपुरी पडत आहे.
दरम्यान, पोलिस आयुक्तालयाची स्वमालकीची जागा मिळावी, यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर चिखली येथील एनएनजीएल पेट्रोल पंपासमोरील गट क्रमांक येथील ५३९ ३. ३९ हेक्टर जागा शासनाकडून २३ सप्टेंबर २०२४ रोजी आयुक्तालयासाठी ताब्यात मिळाली आहे. आता इमारत उभारणीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची इमारत देशातील आधुनिक इमारत ठरेल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळेही इमारत कशी असेल याकडे लक्ष लागले आहे.
शासनाच्या सावर्जनिक बांधकाम विभागामार्फत या इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. इमारत बांधकामासाठी १८० कोटींच्या खर्चास देखील मान्य मिळालेली आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया पार पडल्यानंतर इमारती उभारणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, इमारत उभारणीसाठी लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलाला लवकरच हक्काची प्रशस्त इमारत उपलब्ध होणार आहे.
आयुक्तालयासाठी भव्य इमारत उभारली जात आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. कोयता गॅंगच्या मुसक्या आवळण्यासह वाहन तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
आयुक्तालयाची जागा ताब्यात मिळाली असून, इमारत बांधकामासाठीच्या खर्चासही मान्यता मिळाली आहे. सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे. इमारतीचे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस दलाला आयुक्तालयाची हक्काची इमारत उपलब्ध होणार आहे.
- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड