
मुंबई (Mumbai) : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या टप्प्यातील कामांवर शेवटचा हात फिरवला जात असून, लवकरच हा ७६ किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला होणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत येताच आमणे, भिवंडी ते नागपूर थेट प्रवास आठ तासांत करता येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे इगतपुरी ते आमणे अंतर पार करण्यासाठी सध्या सुमारे अडीच तास लागतात. पण हा टप्पा सुरू होताच हे अंतर अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात मुंबई ते नागपूर असा सुसाट प्रवास करता येणार आहे.
मुंबई ते नागपूर असा एकूण ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी - MSRDC) बांधत आहे. या महामार्गातील ६२५ किमी लांबीचा महामार्ग अर्थात नागपूर – इगतपुरीपर्यंतचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. सध्या इगतपुरी ते अमाणे या शेवटच्या ७६ किलोमीटर टप्प्याचे काम सुरू आहे.
हा टप्पा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचता येणार आहे. तसेच या महामार्गाचा संपूर्ण ७०१ किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी इगतपुरी ते आमने या शेवटच्या टप्प्यातील मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता. मात्र, या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या खर्डी येथील दीड किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम शिल्लक होते.
आता या पुलाची कामे पूर्ण झाली असून केवळ अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. तसेच यापूर्वी या पुलाच्या ठिकाणी एका बाजूचा मार्ग सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न होता. मात्र, समृद्धी महामार्गाचा शेवट होतो त्या आमने येथून पुढे वडपे येथे जाण्यासाठी काम सुरू असलेल्या रस्त्याचे काम अपूर्ण होते.
या भागात असलेल्या गोदामांची जागा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक होती. ही जागा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच सततच्या पावसामुळेही कामे लांबली होती. मात्र, आता पावसाळा संपल्यानंतर एमएसआरडीसीकडून ही कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत.
या ४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची बहुतांश कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, केवळ अंतिम टप्प्यातील काही कामे बाकी असून, येत्या महिनाभरात हा मार्ग सुरू करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर साधारण डिसेंबर अखेरपर्यंत हा टप्पा खुला केला जाण्याची शक्यता आहे.
सध्या समृद्धी महामार्गाचा ६२५ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मे २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर या वर्षाच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील भरवीर आणि इगतपुरी शहरादरम्यानचा अतिरिक्त २५ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.