
खंडाळा (Khandala) : खंडाळा व लोणंद येथे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. याचे मुख्य कारण औद्योगिकरण, लोणंद कांदे बाजारपेठ व खंडाळा तालुक्याचे ठिकाण हे आहे. यामुळे या दोन शहरांभोवती नागरी वस्तीचे प्रमाणदेखील वाढले आहे. या दोन शहरांना जोडणाऱ्या व मोठी रहदारी असणाऱ्या या रस्त्याची चाळण झाल्याने हेलकावे व धक्के खातच १७ किलोमीटरचा रस्ता कसाबसा पार करावा लागत आहे.
खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे, तर लोणंदला कांदा बाजारपेठ म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. यातच खंडाळा, अहिरे, लोणंद भागात अनेक मोठ्या कंपन्यांनी येथे आपले बस्तान बसविले आहे. यामुळे येथे झपाट्याने लोकवस्ती वाढली व हा मार्ग नेहमी वर्दळीचा ठरला. मात्र, खंडाळा- लोणंद रस्त्यावर पडलेले जागोजागचे खड्डे पाहता येथून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तसेच हा रस्ता एकेरी असल्याने कंपनीचे भलेमोठे कंटेनर, मालट्रक पार करून ओव्हरटेक करणे म्हणजे अग्निदिव्य पार केल्यासारखे आहे.
कंपन्यांमुळे हे कंटेनर नेहमीच रस्त्यावर असतात, तसेच खंडाळा, आहिरे, खेड बुद्रुक येथे दाट लोकवस्ती, शाळा, माध्यमिक विद्यालय आहे. परिणामी, या रस्त्यावर इतर वाहनेही सर्वाधिक आहेत. त्यात रस्त्याचे तीनतेरा झाल्याने येथे कासवगतीनेच प्रवास करावा लागतो. अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी एक तासाचा वेळ या ठिकाणी लागत आहे. कार्यालय, शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळात येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. या रस्त्याचे चौपदरीकरण करणे आवश्यक असून, सध्या असणारा रस्ता तरी दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.