
मुंबई (Mumbai): पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरापर्यंत (Vadhvan Port) पोहचण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) वरोर, वाढवण – तवा दरम्यान ३२ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
या महामार्गासाठी २४ गावांमधील ६०० हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे. संयुक्त मोजणी आणि भूसंपादनाची प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करून नव्या वर्षात या महामार्गाच्या बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. आठ मार्गिकांचा समावेश असलेला द्रुतगती महामार्ग बांधण्यासाठी ३५१५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
पालघरमधील वाढवण बंदरामुळे येत्या काळात पालघरसह राज्याचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. वाढवण बंदरावर पोहोचण्यासाठी सध्या स्वतंत्र रस्ता नाही. तवा येथून पालघर आणि मग पुढे वरोरवरून वाढवण बंदर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पोहोचावे लागते. यासाठी किमान दीड तास लागतो.
वाढवण बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी एनएचएआयने तवा जंक्शन – वरोर, वाढवण दरम्यान ३२.१८० किमी लांबीचा, ३५१५,३० कोटी रुपये खर्चाचा, आठ मार्गिकांचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लावण्याच्यादृष्टीने सध्या एनएचएआयकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
आतापर्यंत भूसंपादनाची ५० टक्के प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती एनएचएआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या ३२.१८० किमी लांबीच्या महामार्गासाठी पालघरमधील २४ गावांमधील ६०० हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. ही जागा संपादित करण्याच्यादृष्टीने संयुक्त मोजणी अंतिम टप्प्यात आहे. २४ पैकी २२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून, हनुमान नगर आणि नेवाळे या दोन गावांमधील संयुक्त मोजणी शिल्लक आहे.
ही मोजणी येत्या काही दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करून प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यांत ९० टक्के जागा ताब्यात घेऊन महामार्गाच्या बांधकामासाठी टेंडर काढण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
वरोर – तवा दरम्यान रस्ताच नाही. एनएचएआयने द्रुतगती महामार्ग बांधल्यास तवा येथून वरोर, वाढवण बंदराला दीड तासांऐवजी ३० मिनिटांत पोहचता येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या रस्त्यावरून २०५० पर्यंत दिवसाला दोन लाख ३६ हजार १४२ वाहने धावतील, असा दावाही एनएचएआयकडून करण्यात आला आहे.
काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचेही एनएचएआयचे नियोजन आहे. एनएचएआयच्या वरोर – तवा जंक्शन महामार्गाची जोडणी पुढे समृद्धी महामार्गापर्यंत केली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तवा जंक्शन – भरवीर दरम्यान १०४ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधणार आहे. त्यामुळे वाढवण बंदरावरून पुढे नागपूरपर्यंत जाणे सोपे होणार आहे.