Navi Mumbai Metro च्या 5,575 कोटींच्या 2 नव्या मार्गांना मंजुरी; तळोजा, कळंबोली, खांदेश्वरला मिळणार थेट T4 कनेक्टिव्हिटी

तळोजा ते विमानतळापर्यंत १७ किमीचा नवा उन्नत मार्ग; सागर संगम ते सीबीडी बेलापूर जोडणीसह विमानतळ सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस, विमानतळाभोवती मेट्रोचे परिपूर्ण वर्तुळ! सिडकोच्या दोन भव्य मार्गिकांच्या कामांचे लवकरच निघणार टेंडर
Navi Mumbai Metro
Navi Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो विस्तार प्रकल्पांना अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबई मेट्रो मार्ग 1ए आणि मार्ग 2च्या 5 हजार 575 कोटींच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार असून, आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट मेट्रो जाळ्याशी जोडले जाईल.

Navi Mumbai Metro
Mumbai Water Metro: ट्राफिकची कटकट संपणार! मुंबईत धावणार हायटेक 'वॉटर मेट्रो'; 31 जलमार्ग 45 टर्मिनल्सचा मेगा प्लॅन

मेट्रो मार्ग १ ए आणि मार्ग २ या दोन्ही प्रकल्पांसाठी ५,५७५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या विस्तारामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण २८ किलोमीटरचा सलग मेट्रो प्रवास प्रवाशांना उपलब्ध होईल. या नव्या मार्गांमुळे भविष्यात दररोज सुमारे १२ लाख प्रवाशांना वेगवान प्रवासाचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे.

नवी मुंबई मेट्रो मार्ग १ए (सागर संगम ते सीबीडी बेलापूर)

हा मार्ग सध्या सुरू असलेल्या बेलापूर ते पेंधर (मार्ग १) चा विस्तार आहे, जो विमानतळाच्या पश्चिमेकडील बाजूला जोडला जाईल. याची लांबी सुमारे ३ किलोमीटर असून या मार्गावर २ नवीन स्थानके असतील. हा मार्ग सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक परिसरामधून नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील 'सागर संगम' स्थानकापर्यंत नेण्यात येईल. पुढे तो मुंबई-नवी मुंबई विमानतळ एक्सप्रेस मार्गिकेला (मेट्रो मार्ग ८) जोडला जाईल.

Navi Mumbai Metro
Pune Metro Line 3: आयटी हबची कोंडी फुटणार! 'या' दिवसापासून हिंजवडी ते बालेवाडी प्रवास होणार सुखाचा

नवी मुंबई मेट्रो मार्ग २ (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ - T4) हा मार्ग तळोजा/पेंधर भागाला विमानतळाच्या पूर्वेकडील टर्मिनल-४ (T4) शी जोडणारा मुख्य कॉरिडॉर ठरेल. याची लांबी सुमारे १७ किलोमीटर (उन्नत मार्ग) असून या विस्तारामध्ये एकूण ११ स्थानकांचा समावेश आहे. हा मार्ग आसावरी, तळोजा सेक्टर १५, एमआयडीसी, नावडे रेल्वे स्थानक, कुदूपाडा गाव, रोडपाली बस स्थानक, कळंबोली, कामोठे आणि खांदेश्वर या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमधून थेट विमानतळाच्या टर्मिनल-४ पर्यंत धावेल.

Navi Mumbai Metro
Mumbai Metro 14: खासगी कंत्राटदारांनी फिरवली पाठ; आता कर्ज काढून ईपीसी तत्त्वावर धावणार बदलापूर मेट्रो

सध्या पेंधर ते सीबीडी बेलापूर दरम्यान ११ किमीचा मार्ग १ कार्यरत आहे. आता या दोन नव्या मार्गिकांमुळे पेंधर आणि बेलापूर दोन्ही बाजूंनी थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाता येणार आहे, ज्यामुळे विमानतळाभोवती मेट्रोचे एक परिपूर्ण 'वर्तुळ' तयार होईल.

या मंजुरीमुळे सिडको लवकरच या मार्गांच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करेल, ज्यामुळे विमानतळ सुरू होण्यापूर्वी ही कनेक्टिव्हिटी तयार करण्याचे उद्दिष्ट गाठता येईल.

Navi Mumbai Metro
भविष्यातील मुंबईचा वायू वेगाने प्रवास! दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रोवर मोहर

Key Points Summary

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट मेट्रो जाळ्याशी जोडण्यासाठी ५ हजार ५७५ कोटी रुपयांच्या दोन नव्या मार्गिकांना मंजुरी.

  • मेट्रो मार्ग १ए सागर संगम ते सीबीडी बेलापूर दरम्यान ३ किलोमीटर लांबीचा असेल, ज्यामध्ये २ नवीन स्थानके असतील.

  • मार्ग २ पेंधर ते थेट विमानतळाच्या टर्मिनल ४ ला जोडणारा १७ किलोमीटरचा मार्ग असेल, ज्यामध्ये ११ स्थानके असतील.

  • तळोजा, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर आणि औद्योगिक वसाहतींमधील रहिवाशांना थेट विमानतळाची वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार.

  • विमानतळाभोवती मेट्रोचे परिपूर्ण वर्तुळ तयार होणार असून भविष्यात दररोज १२ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज.

  • विमानतळ सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी सिडकोकडून लवकरच प्रत्यक्ष बांधकामाचे टेंडर प्रसिद्ध केले जाणार.

Tendernama
www.tendernama.com