.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई (Mumbai) : मुंबईकर नागरिकांच्या कररूपी पैशांची बचत करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ऐसपैस अंदाजपत्रक तयार करणे, सल्लागारांवर विसंबून राहणे कटाक्षाने टाळले पाहिजे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवणे ही गरज बनली आहे. तसेच विकासकामे दर्जेदार, निश्चित वेळेत आणि मंजूर अंदाजपत्रकानुसारच झाली पाहिजेत अशा सूचना महापालिका आयुक्त हा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी महापालिका अभियंत्यांना केल्या.
मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक, पाणीपुरवठा, इमारत परिरक्षण, नगर अभियंता, वास्तुविशारद, इमारत प्रस्ताव, पर्जन्य जलवाहिन्या विभागातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी संवाद साधला. महापालिका अभियंता हे तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत. रस्ते, पाणी, वीज, घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्या या पायाभूत सुविधांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. याचे श्रेय अभियंता वर्गाला दिले पाहिजे. मात्र, अभियंत्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम केल्यास, नागरिकांशी सुसंवाद साधल्यास अनेक समस्यांवर मात करता येईल व समस्यांचे निराकरण सोयीचे होईल, असे प्रतिपादन डॉ. भूषण गगराणी यांनी केले. प्रत्यक्ष कार्यस्थळावर कामकाज करताना स्थानिक रहिवाशी, लोक प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधावा, अशाही सूचना गगराणी यांनी केल्या.
सर्व अभियंता वर्गाने प्रत्यक्ष कार्यस्थळावर गेले पाहिजे. त्यामुळे अडीअडचणींची जाणीव होऊन त्यावर योग्य तो तोडगा निघू शकेल. केवळ कार्यालयात बसून समस्यांचे निराकरण शक्य होत नाही. माहिती तंत्रज्ञान, कितीही प्रगत झाले तरी ‘फिल्ड वर्क’ला पर्याय नाही. जे अभियंता नागरिकांशी, लोकप्रतिनिधीसमवेत संवाद साधतात, त्यांना कमी समस्यांना समोर जावे लागते. जे अभियंता तोंडदेखले जातात, त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागते. त्यामुळे सर्वांनी संवाद साधण्याची कला वृद्धिंगत करावी, अशी अपेक्षा गगराणी यांनी व्यक्त केली.
अभियंत्यांनी तारतम्याचा वापर केला पाहिजे. विकासकामे दर्जेदार, ठरवलेल्या वेळेत आणि मंजूर अंदाजपत्रकानुसारच झाली पाहिजे असेही गगराणी यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेचा अवाढव्य पसारा लक्षात घेता अभियंत्यांनी अधिक तांत्रिक, प्रशासकीय कौशल्ये आत्मसात करायला हवीत. समन्वय, सुसंवाद यांच्या साहाय्याने समस्यांचे निराकरण केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. कनिष्ठ अभियंता, महानगरपालिकेतील इतर विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सल्लामसलत केली पाहिजे. भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील सभागृहात झालेल्या या संवाद मेळ्यास अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे आदी उपस्थित होते.