
मुंबई (Mumbai) : नवीन वर्षात मुंबईतील संपूर्ण कोस्टल रोड वाहतुकीला खुला होणार आहे. त्याआधी वांद्रे वरळी सी लिंक जोडण्यासाठी तिसरा आणि शेवटचा महाकाय गर्डर बसवण्यात आला आहे. कोस्टल रोडवर नुकतीच 60 मीटर लांब, 560 टनाचा गर्डर जोडण्याची मोहिम यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर फक्त 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
मुंबई महापालिकेमार्फत मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यासाठी महाकाय गर्डर बसवण्यात आला आहे. महिनाभरात सिमेंट काँक्रिट, अस्फाल्ट करणे अशी कामे पूर्ण झाल्यावर हा कोस्टल रोड सुरु करण्यात येईल.
या गर्डरमुळे मरीन ड्राईव्ह ते हाजीअलीपर्यंत कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी-लिंक जोडला जाणार आहे. यामुळे कोस्टल रोडवरुन मरीन ड्राईव्ह ते वांद्रे असा थेट प्रवास करता येणार आहे. यामुळे अवघ्या 12 मिनिटांत मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास पूर्ण होणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्याने वरळी परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे.