
मुंबई (Mumbai) : क्रॉफर्ड मार्केटजवळची छत्रपती शिवाजी महाराज मंडई, मलबार हिलचे बेस्टचे पॉवर स्टेशन आणि वरळीतील अस्फाल्ट प्लांटच्या जागेचा लिलाव रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुदतीत एकही अर्ज न आल्याने ही टेंडर प्रक्रिया महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थांबवली आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने काही विनावापर असलेल्या आणि भविष्यात ज्या जागांची महापालिकेला गरज नाही असे भूखंड भाडेकरार पट्ट्यावर देऊन त्यातून महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन भूखंड लिलाव पद्धतीने भाडेकरारावर देण्यासाठी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वारस्य अभिरुची अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये ए विभागातील छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेचा समावेश आहे. येथील मंडई पाडण्यात आली असून यातील मच्छिमार गाळेधारकांना क्रॉफर्ड मार्केंटमधील जागेमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. या जागेवर मंडई आणि महापालिका कार्यालय असे आरक्षण आहे. परंतु ही जागा भाडेकरारावर दिल्यानंतर यावरील आरक्षण पूर्णपणे काढून ही जागा भाडेकरारावर देऊन त्याचा वापर निवासी किंवा वाणिज्य वापरासाठी बांधकाम करता येईल अशाप्रकारच्या अटीचा समावेश होता.
सध्या मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येत असल्याने रस्त्यांच्या बांधकामासाठी डांबराचा वापर कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेचा अस्पाल्ट प्लांटच्या जागेचा वापर कमी होणार आहे. त्यामुळे या जागेचा काही भाग हा भाडेकरारवर देऊन उर्वरित भाग लॅब करता ठेवणे असे निश्चित करण्यात आले. तर मलबार हिल येथील एका जागेवर बेस्ट रिसिव्हिंग स्टेशन आहे. या रिसिव्हिंग स्टेशनच्या आकार कमी करून यातील काही भाग भाडेकरारवर देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. हे तिन्ही भूखंड सध्या विना वापर पडून असल्याने महापालिकेने हे भूखंड भाडेकरारावर देऊन यातून महापालिकेला अधिकाधिक महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी मागवलेल्या स्वारस्य अभिरुची अर्जाद्वारे महापालिकेला या भूखंडातून किती निधी प्राप्त होऊ शकतो, याचा अंदाज येईल. आणि त्यानुसार महापालिका त्या भूखंडासंदर्भात रक्कम निश्चित करून लिलावाची रक्कम ठरवली जाईल, असा विचार होता. पण प्रत्यक्षात यासाठी मागवलेल्या स्वारस्य अर्जाला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर भूखंडाचा लिलाव करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
भाडेकरारावर या जागांचा होणार होता लिलाव -
महापालिका डी विभागातील बेस्ट रिसिव्हींग स्टेशन, सीएस क्रमांक ४३९ (अंशत
जागेचे क्षेत्रफळ : सुमारे २४०० चौरस मीटर
वरळी अस्फाल्ट प्लांट, सीएस क्रमांक १६२९ (अंशत
जागेचे क्षेत्रफळ : निश्चित करण्यात आलेले नाही
महापालिका ए वॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सीएस क्रमांक १५००
जागेचे क्षेत्रफळ : ८६०० चौरस मीटर