
मुंबई (Mumbai) : अभ्युदय नगर वसाहतीच्या पुनर्विकासातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला (MHADA Mumbai Board) ४० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ आणि सुमारे ८०० कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. काळाचौकी येथील अभ्युदनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठीची टेंडर (Tender) प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे.
अभ्युदय नगर वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. ३३ एकर जागेवरील ४९ इमारतींच्या पुनर्विकासाअंतर्गत ३३५० कुटुंबांना अंदाजे ६३५ चौरस फुटांचे घर दिले जाणार आहे.
मोतीलाल नगरच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेन्ट एजन्सीची अर्थात खासगी विकासकाच्या नियुक्ती करून म्हाडाच्या माध्यमातून हा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला ४० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ आणि सुमारे ८०० कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे.
या पुनर्विकासासाठी मंडळाने विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी टेंडर प्रसिद्ध केले. टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर रोजी होती. मात्र आचारसंहिता, निवडणुकीची धामधूम लक्षात घेता टेंडरला मुदतवाढ देण्यात आली.
या मुदतवाढीनुसार टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर आहे. या प्रकल्पासाठी नुकतीच टेंडर पूर्व बैठक पार पडली. या बैठकीला ठेकेदार कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
तसेच यावेळी या कंपन्यांनी टेंडर सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठांनी दिली. त्यामुळे अभ्युदयनगर पुनर्विकासाच्या टेंडरला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.