
मुंबई (Mumbai) : देशातील घरांच्या विक्रीने नुकत्याच सरलेल्या वर्षात (२०२४) गेल्या १२ वर्षांतील उच्चांक नोंदवला आहे. मुंबई, दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकता आणि चेन्नई या देशातील प्रमुख आठ बाजारपेठांमध्ये २०२४ मध्ये तीन लाख ५० हजार ६१३ घरांची विक्री झाली आहे.
वाढती मागणी आणि उच्च किमतीच्या घरांच्या खरेदीकडे वाढलेल्या कल यामुळे ही वाढ झाली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार कंपनी नाईट फ्रँक इंडियाच्या ‘इंडिया रिअल इस्टेट: रेसिडेन्शिअल अँड ऑफिस’ या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
घरांच्या विक्रीत वार्षिक सात टक्क्यांनी वाढ झाली असून, सर्वाधिक वाढ हैदराबाद आणि पुण्याने नोंदवली आहे. मुंबईत घरांच्या किमतीने गेल्या १३ वर्षांतील विक्रम नोंदवला. तिथे ९६,१८७ घरांची विक्री झाली, एकूण विक्रीत मुंबईने २७ टक्के योगदान दिले. सर्व बाजारपेठांमध्ये घरांच्या किमती वाढल्या असून, बंगळूरमध्ये सर्वाधिक १२ टक्के वाढ झाली आहे.
घरांच्या किमतीनुसार, दोन ते पाच कोटी रुपयांच्या किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये वार्षिक ८५ टक्के वाढ झाली. कमी किमतीच्या म्हणजे ५० लाखांहून आणि ५० लाख ते एक कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीत मात्र घट झाली आहे.
नव्या गृहप्रकल्पांचे प्रमाण सहा टक्क्यांनी वाढले असून, तीन लाख ७२ हजार ९३६ घरे उपलब्ध झाली. तिमाहीमधील घरांच्या विक्रीतील वाढ आणि वेगवान विक्रीचे संकेत यामुळे विक्रीला चालना मिळाली आहे.
ठळक वैशिष्ट्ये
५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत नऊ टक्के घट झाली असून, हे प्रमाण एकूण विक्रीच्या २५ टक्के आहे. या श्रेणीतील जवळपास निम्मा वाटा मुंबईचा आहे.
५० लाख ते एक कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीत वार्षिक दहा टक्के घट झाली आहे. मात्र, ही श्रेणी सर्वाधिक सक्रिय आहे. या श्रेणीतील घरांच्या विक्रीत पुणे आघाडीवर आहे. पुण्यात २०२४ मध्ये २३,९७८ घरांची विक्री झाली.
एक ते दोन कोटी रुपये किमतीच्या घरांनी मजबूत कामगिरी नोंदवली. याचा वाटा एकूण विक्रीच्या २६ टक्के असून, यात सर्वांत मोठा हिस्सा बंगळूरचा आहे.
दोन ते पाच कोटी रुपयांच्या श्रेणीतील घरांच्या विक्रीत ८२ टक्के वाढ झाली असून, आलिशान घरांच्या मागणीत वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.
एक ते दहा कोटी रुपये किमतीच्या प्रीमियम आणि अल्ट्रा-प्रीमियम विभागातील श्रेणीमध्ये वार्षिक ४६ टक्के वाढ झाली आहे. २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची मागणीही लक्षणीयरित्या वाढली आहे.
गेल्या पाच वर्षांत, एक कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, या विभागातील विक्री २०१९ मधील ४५ हजारांवरून २०२४ मध्ये १.५३ लाखांपेक्षा अधिक वाढली आहे. या श्रेणीतील घरांची मागणी आठही बाजारपेठांमध्ये तिप्पट झाली आहे.
घरांच्या विक्रीने वर्ष २०२० पासून चांगली गती घेतली असून, २०२४ मध्ये गृहविक्री १२ वर्षांच्या उच्चांकी पोहोचली आहे. वाढत्या जीवनशैलीच्या गरजांना अनुकूल घरांच्या उपलब्धतेमुळे उच्च किमतीच्या घरांची मागणी वाढत आहे. देशातील स्थिर आर्थिक स्थिती आणि स्थिर व्याजदर यामुळे नव्या वर्षात पाऊल टाकताना घरांच्या बाजारपेठेच्या वाढीसाठी सकारात्मक वातावरण आहे.
- शिशिर बैजल, अध्यक्ष, नाइट फ्रँक इंडिया