
पिंपरी (Pimpri) : महापालिकेचा २०२५-२६चा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. फेब्रुवारीत अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामध्ये कोणते नवीन प्रकल्प असतील, सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी किती तरतूद असेल, याची उत्सुकता आहे.
महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते. त्यामध्ये दहा लाखापर्यंतची कामे सामान्य नागरिकांनाही सुचविता येतात. त्यांची पडताळणी होऊन आवश्यक असलेल्या कामांचा समावेश अर्थसंकल्पात केला जातो. शिवाय, आठही प्रभाग स्तरावरील कामांचा समावेशही त्यामध्ये असतो. त्यासाठी स्वतंत्र तरतूद असते. लेखा व वित्त विभागाकडून स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला जातो.
स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा होते. स्थायीचे सदस्य काही हरकती व सूचना सुचवितात. त्यांचा समावेश करून अंतिम अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडला जातो. सभेची मंजुरी मिळाल्यानंतर एक एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली जाते. मात्र, १३ मार्च २०२२ रोजी लोकप्रतिनिधींची मुदत संपली आहे. त्यामुळे १४ मार्च २०२२ पासून आयुक्त हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत.
स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सर्वसाधारण सभांचे पीठासन अधिकारी म्हणूनही तेच कामकाज पाहत आहेत. त्यामुळे २०२५-२६चा अर्थसंकल्पही लेखाविभागाकडून स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून प्रशासक शेखर सिंहच स्वीकारतील.
पर्यावरणीय अर्थसंकल्पही...
महापालिकेच्या २०२५-२६ या नियमित अर्थसंकल्पासोबतच पर्यावरणीय अर्थसंकल्प (क्लायमेट बजेट) प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानुसार हवामान आणि हवामान बदल, आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान बदलासाठी निश्चित केलेली धोरणे आणि दृष्टिकोन, पर्यावरणीय अर्थसंकल्पाची गरज, नियमित अर्थसंकल्प आणि पर्यावरणीय अर्थसंकल्प तुलना, पर्यावरणीय अर्थसंकल्प म्हणजे काय?, महापालिकेसाठी पर्यावरणीय अर्थसंकल्प, महापालिकेच्या पर्यावरणीय अर्थसंकल्पाची क्रमवार प्रक्रिया, पर्यावरणीय अर्थसंकल्पातील मर्यादा आणि जोखीम, पर्यावरणीय अर्थसंकल्पाचे चांगले परिणाम- निष्पत्ती आदीबाबत सविस्तर माहिती त्यामध्ये आहे.
चार तत्त्वांवर भर...
- अंगभूत पर्यावरण आणि ऊर्जा ः हरित इमारती आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांद्वारे पारंपरिक ऊर्जेचा वापर कमी करणे
- वाहतूक ः इलेक्ट्रिक वाहने आणि सार्वजनिक परिवहन आदी ठिकाणी हरित-स्वच्छ-ऊर्जा वाहतूक प्रणालींना प्रोत्साहन देणे
- घनकचरा व्यवस्थापन ः कचरा ते ऊर्जा प्रकल्पांद्वारे कचरा पुनर्वापरात सुधारणा करणे आणि लँडफिलचा वापर कमी करणे
- पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन ः पावसाचे पाणी साठवण, सांडपाणी पुनर्वापर आणि पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे
जागतिक श्रेणीत उद्योगनगरी
हवामान अंदाजपत्रक फ्रेमवर्कमुळे शहरात खर्च केलेला प्रत्येक रुपया प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामानातील लवचीकता मजबूत करण्यासाठी योगदान देईल. यामुळे पिंपरी-चिंचवडला ओस्लो, लंडन, न्यूयॉर्क आणि मुंबई सारख्या जागतिक शहरांच्या पंक्तीत आणले जाणार आहे. ज्यांनी वाढत्या हवामान संकटाचा सामना करण्यासाठी समान आराखडा स्वीकारला आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे कामकाज सुरू आहे. विविध कामे, तरतुदींबाबत विभागनिहाय अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. या अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचाही समावेश केला जाणार आहे. या व्यतिरिक्त हवामान अर्थसंकल्पावरही भर दिला जात आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका