
मुंबई (Mumbai): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway) सर्व्हिस रोड, अंडरपास, ब्लॅकस्पॉट काढण्याच्या आवश्यकतेबाबत नवीन उपाययोजना कराव्या लागणार असून त्यासाठी 200 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे नवीन ज्याठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न असून दावे प्रलंबित आहेत. ते दावे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ठेकेदारांमधील वादात जर हा महामार्ग अडकणार असेल तर केंद्रीय मंत्री गडकरींना सांगून कामे काढून घेतली जातील आणि जो करणार असेल, त्याला काम देण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी ठेकेदारांना दिला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. तत्पूर्वी त्यांनी महाड आणि रत्नागिरीत अधिकार्यांच्या बैठका घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संगमेश्वर येथे ट्रॅफिक जामचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असतो. याबाबत मार्ग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संगमेश्वर येथील दोन्ही पूल, भरावाची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील.
संगमेश्वरमध्ये ठेकेदारांमध्ये सामंजस्य दिसून येत नाही. त्यामुळेच काही प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत ठेकेदाराला दंडही ठोठावण्यास सुरुवात झालेली आहे. संबंधित अधिकार्यांना व ठेकेदारांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नसेल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगून त्यांच्याकडून काम काढून घेण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे. जो काम वेळेत करेल त्याला हे काम देण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.