
मुंबई (Mumbai) : बोरिवली बाजूकडील उर्वरीत ३,६५८ चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएकडे हस्तांतरीत केल्यामुळे ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बोगद्यामुळे ठाणे बोरिवलीतील नागरिकांना अवघ्या १५ मिनिटात प्रवास करता येणार आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरकरांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी ठाणे - बोरिवली दुहेरी बोगदा उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला भूसंपादनाचा अडथळा होता. बोरिवली बाजूकडील उर्वरीत ३,६५२ चौ. मी. जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे होते. मात्र आता ही जागा एमएमआरडीएकडे हस्तांरित करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडथळे दूर झाले असून, या प्रकल्पाचे काम लवकरच गतीने सुरू होणार आहे. एमएमआरडीएकडून ठाणे - बोरिवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ११.८५ किलोमीटर लांबीच्या मार्गाची उभारणी केली जात आहे. यात १०.२५ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी १८,८३२ कोटी रूपये खर्च होणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पाचा दर्जा दिला आहे.
एमएमआरडीएने या प्रकल्पाचे काम 'मेघा इंजिनिअरिंग' कंपनीला जून २०२३ मध्ये दिले. आता या प्रकल्पाचे ठाणे बाजूकडील काम सुरू झाले आहे. ठेकेदाराने भुयारीकरणासाठी टीबीएम मशीन बोगद्यात उतरविण्यासाठी शाफ्ट उभारणीचे काम सुरू केले आहे. मात्र, बोरिवली बाजूकडील भुयारीकरणापूर्वीची प्राथमिक कामे सुरू झालेली नाहीत. त्यामध्ये भूसंपादनाचा अडथळा होता. पण आता प्रकल्पासाठी आवश्यक सर्व जमीन एमएमआरडीएकडे हस्तांतरीत झाली आहे.