

मुंबई (Mumbai): ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधांनी युक्त बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची माहिती दिली, ज्यामध्ये भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवर, आंतरराष्ट्रीय स्तराचे ॲम्युझमेंट पार्क आणि अत्याधुनिक क्रीडा संकुलांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे ठाणेकरांचे जीवनमान उंचावणार असून, जिल्ह्याच्या विकासाचा वेग लक्षणीय वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे शहराला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील बहुतेक प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून, ते सर्व बीओटी त्वावर विकसित केले जाणार आहेत.
भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवर
सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणजे ठाणे खाडी किनारी ५० एकरमध्ये उभारला जाणारा व्हिविंग टॉवर. हा टॉवर २६० मीटर उंच असेल, जो देशातील सर्वात उंच टॉवर बनण्याची शक्यता आहे (फ्रान्समधील आयफेल टॉवर ३०० मीटर उंच आहे). हा टॉवर ठाण्याच्या क्षितिजावर एक नवीन ओळख निर्माण करेल आणि पर्यटनाला चालना देईल.
आंतरराष्ट्रीय दर्जाची मनोरंजन केंद्रे
ठाणेकरांना मनोरंजनासाठी आता दूर जावे लागणार नाही. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क, आणि ॲडव्हेंचर पार्क विकसित केले जातील. यामुळे नागरिकांना जागतिक स्तरावरील मनोरंजन अनुभव मिळेल. कासारवडवली येथे कन्व्हेन्शन सेंटर आणि कोलशेत येथे २५ एकरमध्ये टाऊन पार्क उभारले जाईल. २५ एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटरची निर्मिती होणार आहे.
क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन
प्रतिभावान खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी ५० एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. याशिवाय, सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आगरी कोळी संग्रहालय आणि मत्स्यालय ठाण्याची स्थानिक संस्कृती जपण्यास मदत करतील. विज्ञान केंद्र आणि १२.५ एकरमध्ये पक्षी संग्रहालय ज्ञान आणि निसर्ग अभ्यासासाठी महत्त्वाचे केंद्र बनतील.
‘आनंदवन हरित पट्टा’ व निसर्ग संवर्धन
पर्यावरण संवर्धनासाठी ठाणे महापालिकेकडून एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जाणार आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून १८.४ कि.मी लांबीचा 'आनंदवन हरित पट्टा' विकसित केला जाणार आहे. यामुळे शहरात हिरवळ वाढेल आणि नागरिकांना नैसर्गिक वातावरणाचा लाभ मिळेल.