Eknath Shinde: अवघ्या दीड वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार!

BEST: बेस्टच्या ताफ्यात नव्या कोऱ्या 157 ई-बस दाखल
Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईने आज पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे वळण घेतले आहे. तब्बल 157 इलेक्ट्रिक बसेस बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)च्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे सुमारे तीन लाख प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त होणार आहे.

Eknath Shinde
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे सुसाट

या उपक्रमामुळे मुंबईचे आकाश स्वच्छ, आणि रस्ते हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कुलाबा येथे पार पडलेल्या बेस्टच्या या पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बस लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, वरिष्ठ अधिकारी भूषण गगराणी, सोनिया शेट्टी यांच्यासह बेस्टचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, “मुंबईत एकेकाळी ट्राम आणि बग्ग्या धावत होत्या, आज त्या ठिकाणी वातानुकूलित आणि पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व बसेस पर्यावरणपूरक बनवण्याचा आमचा संकल्प आहे. हे केवळ वाहतुकीतील सुधारणा नसून मुंबईच्या विकासाचे हरित वळण आहे.”

Eknath Shinde
प्रवाशांची दिवाळी 'गोड' करणाऱ्या एसटीचा यंदा विक्रमी धमाका; रेकॉर्ड ब्रेक कमाई!

ते पुढे म्हणाले, “महायुती सरकार म्हणजे गतिमान सरकार. कुलाब्यातील लोकार्पणाबरोबरच गोरेगाव येथील बसेसचे उद्घाटनही ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. हा फक्त कार्यक्रम नाही, तर वचनपूर्तीचा सोहळा आहे.”

शिंदे यांनी सांगितले की, “पूर्वीच्या सरकारच्या काळात बेस्ट सेवा डबघाईला आली होती, पण महायुती सरकार आल्यावर बेस्टला पुन्हा नवसंजीवनी मिळाली. आधीच्या सरकारने बेस्टला वेस्ट केले, मात्र आम्ही 3,400 कोटी रुपये निधी दिला असून यंदा आणखी 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.”

मुंबई महापालिकेचे सातत्याने सहकार्य बेस्टला मिळत असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, “आम्ही फक्त कार्यालयात नाही तर रस्त्यावर उतरून काम करतो. महायुती सरकारने मुंबईचा विकास वेगाने पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.”

Eknath Shinde
Water Taxi In Mumbai: आता गेटवे ऑफ इंडियाहून थेट गाठता येणार नवी मुंबई विमानतळ

शिंदे म्हणाले, “इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणाला आळा बसणार आहे. ही फक्त सुरुवात असून, लवकरच आणखी मोठ्या प्रमाणावर पर्यावरण स्नेही वाहतूक सुविधा निर्माण केल्या जातील. ‘मुंबई वन ॲप’मुळे प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन, एकाच तिकिटावर विविध सेवा, तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध होतील.”

शिंदे यांनी नमूद केले की, “सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीच नफ्याची नसते, पण ती जनतेच्या सोयीसाठी उत्कृष्ट आणि सुरक्षित बनवणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना महापालिकेइतकाच दिवाळी बोनस देण्यात आला आहे.”

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगभरातील लोक येथे येतात. त्यामुळे शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणे आवश्यक आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, “मुंबईत काँक्रीट रस्त्यांचे दोन फेज पूर्ण होत आहेत आणि पुढील दीड वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल.”

ते पुढे म्हणाले, “मुंबईला विकासाचे मारेकरी नव्हे तर विकासाचे वारकरी हवेत. म्हणूनच आम्ही मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत.” असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com