

मुंबई (Mumbai): यंदाची दिवाळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (MSRTC) अत्यंत 'गोड' ठरली आहे. २७ ऑक्टोबर रोजी महामंडळाने या वर्षातील सर्वाधिक ३९ कोटी ७५ लाखांचे उत्पन्न मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. दिवाळी हंगामात वाढलेली प्रवासी संख्या आणि परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीलाच दिलेल्या पसंतीचा फायदा एसटीला झाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे यश
सर्वसामान्य प्रवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी घरापासून दूर राहून अहोरात्र कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला यश आले आहे. १८ ते २७ ऑक्टोबर या १० दिवसांच्या हंगामात महामंडळाने दररोज सरासरी ३० कोटींच्या दराने एकूण ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३७ कोटी रुपयांची महसूलवाढ नोंदवण्यात आली आहे.
राज्यातील ३१ विभागांपैकी पुणे विभागाने २० कोटी ४७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत अव्वल स्थान मिळवले असून, धुळे (१५.६० कोटी रु.) आणि नाशिक (१५.४१ कोटी रु.) विभाग अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले आहेत.
कोण 'पास', कोण 'नापास'
गेल्या काही महिन्यांत अवकाळी पावसामुळे महामंडळाला सुमारे १५० कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे दिवाळी हंगामात महसूल वाढ होण्याची अपेक्षा होती. ऑक्टोबर महिन्यात प्रतिदिन ३४ कोटी रुपयांचे लक्ष ठेवून १०४९ कोटींच्या मासिक उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. तथापि, काही दिवस वगळता हे लक्ष्य पूर्णत्वास गेले नाही.
तरीही पुणे, बीड, अहिल्यानगर, अमरावती आणि बुलढाणा विभागांनी उल्लेखनीय कामगिरी करत महसूलवाढीत मोलाचे योगदान दिले आहे. याउलट सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि धाराशिव विभागांची कामगिरी सुमार राहिल्याचे आढळते.
काय म्हणाले मंत्री सरनाईक?
या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. “दिवाळीच्या काळात घरापासून दूर राहून प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड केली आहे. त्यांच्या समर्पित सेवेमुळेच महामंडळाने हा नवा महसूल विक्रम प्रस्थापित केला,” असे ते म्हणाले.
मंत्री सरनाईक यांनी सातत्याने तोट्यात राहणाऱ्या विभागांच्या कामगिरीबाबतही चिंता व्यक्त करत, त्या विभागांचे सखोल मूल्यमापन करून सुधारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.