.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हद्दीत ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात हद्दीतील नऊशे कोटी रुपयांच्या २४८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाच्या टेंडरची छाननी करण्यात आली आहे. लवकरच या रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार आहेत.
पीएमआरडीएच्या हद्दीचा विकास आराखडा रद्द झाल्यानंतर ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत रस्त्यांबरोबरच पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार होती मात्र ती अद्याप झालेली नाही.
त्यापूर्वी प्रादेशिक विकास आराखडा तसेच रद्द झालेल्या विकास आराखड्यातील आणि अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण आदी कामांवर प्राधिकरणाने लक्ष दिले आहे. त्या अंतर्गत ही रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.
प्रामुख्याने प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने तातडीने मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामध्ये हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतुकीसह नागरी समस्या निकाली काढण्यासाठी रस्ते रुंदीकरण तसेच नवे रस्ते तयार करण्यात येणार आहेत.
यामध्ये वर्तुळाकार रस्ता आणि राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू असून त्यासंबंधी तातडीने मोजणी करून भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.
नाशिक फाटा ते राजगुरुनगर (एनएच ६०) या मार्गावरील उन्नत मार्गिकेच्या प्रवेश मार्गासाठी (ॲप्रोच रॅम्प) नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रूक, चिंबळी, कुरुळी, चाकण (ता. खेड) या गावांत रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया राबविणे. यांसह चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधील जमिनींचे भूसंपादन करून पर्यायी बाह्य वळण रस्ते तयार करण्यात येणार आहेत.
मुळशी तालुक्यातील बालेवाडी ते शेंडगेवस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती आणि नांदे - माण यांसह इतर मार्गांवरील भूसंपादन प्रस्ताव तयार केले आहेत. नवले पूल भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
प्राधिकरणाच्या हद्दीत ९०० कोटी रुपयांचे २४८ किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार आहेत. त्यामध्ये काही रस्ते प्रादेशिक आराखड्यातील, काही ताब्यात घेतलेल्या जमिनीवर प्रस्तावित असून काही अस्तित्वातील रस्ते मोठे करण्यात येणार आहेत. या रस्त्यांच्या टेंडर काढल्या असून त्यांची छाननी देखील पूर्ण झाली आहे.
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए