Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; एसटी कर्मचाऱ्यांना...
मुंबई (Mumbai) : राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज येथे केली.
महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी १२ महिन्यासाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनीधींची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्या सोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छतागृह, विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजे असे सांगत एसटी तोट्यातून वर कशी काढता येईल याचा अभ्यास करा. एसटीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी संघटनांच्या प्रतिनीधींनी विविध मागण्या केल्या. एसटीची उत्पन्न वाढ, इंधन बचत, यावरही चर्चा झाली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर ४६ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जून २०२५ च्या वेतनापासून मुळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर "धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही पैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत अशा कर्मचाऱ्यांना कामगिरीवर असताना- नसताना (दोन्ही प्रकरणी) अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास एक कोटी, पुर्णतः अपंगत्व आल्यास एक कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाईल.
एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. याचा लाभ सुमारे ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसुळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.