.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : पुणे - सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway) मोठी वाहतूक कोंडी होते. ती फोडण्यासाठी राज्य शासनाने हडपसर ते यवतपर्यंत सहा पदरी उड्डाणपूल (Hadapsar To Yawat Flyover) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पुणे - सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असून, हडपसर ते यवतपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यामुळे अनेक वेळा नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हडपसर ते यवत दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच सध्या अस्तित्वातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून, हा रस्ताही सहा पदरी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
या सर्व प्रकल्पासाठी पाच हजार २६२ कोटींच्या खर्चासही शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव प्रज्ञा वाळके यांनी काढले आहेत.
या प्रकल्पाचे काम बीओटी तत्त्वावर केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या रस्त्यावर सर्व वाहनांसाठी टोल आकारण्यात येणार आहे. या कामाची ‘वर्क आॅर्डर’ दिल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे.