
पिंपरी (Pimpri) : नाशिक फाटा मेट्रो स्थानकावरून प्रवास करणाऱ्या पिंपळे सौदागर व भोसरी भागांतील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक फाट्यावरून भोसरी व पिंपळे सौदागरला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील बीआरटी मार्गाला आता उन्नत पादचारी (फूट ओव्हर ब्रिज) पुलाद्वारे मेट्रो स्थानकाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना मेट्रो स्थानक गाठणे अधिक सुलभ व सुरक्षित होणार आहे. जिल्ह्यासह शहरात प्रथमच अशा पद्धतीचा उन्नत पादचारी मार्ग बनत आहे.
पिंपरी चिंचवड मेट्रोचे नाशिक फाटा स्थानक हे एक महत्वाचे स्थानक आहे. या भागांत दररोज हजारो प्रवासी मेट्रोद्वारे प्रवास करतात. मात्र, पिंपळे सौदागर किंवा भोसरीहून येणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रो स्थानक गाठणे ही एक मोठी समस्या होती. सध्या नागरिकांना उड्डाणपुलावरून बीआरटी मार्ग ओलांडण्यासाठी वाहनांच्या गर्दीतून पूल उतरावा लागत होता.
अनेक वेळा अपघाताची शक्यता निर्माण होते. महिलांनाही सुरक्षिततेच्या बाबतीत अडचणी भासतात. नवीन उन्नत पादचारी पूल मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मशी थेट जोडलेला असेल. त्यामुळे पिंपळे सौदागर आणि भोसरीहून येणाऱ्या नागरिकांना सरळ पुलावरून मेट्रो स्थानक गाठता येणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
स्थान : नाशिक फाटा मेट्रो स्थानक ते उड्डाणपुलावरील बीआरटी मार्ग
उद्दिष्ट : मेट्रो स्थानकापर्यंत पादचारी प्रवाशांना थेट, सुरक्षित आणि सुलभ प्रवेश उपलब्ध करून देणे
प्रकार : उन्नत पादचारी पूल
कामाचा शुभारंभ : १५ मे २०२५
कामाचा अंदाजे कालावधी : ६ महिने (नोव्हेंबर २०२५ पर्यंत)
प्रमुख लाभार्थी : पिंपळे सौदागर, भोसरी परिसरातील नागरिक
पुलाची रचना व सुविधा :
- उन्नत पादचारी पुलाचे डिझाईन आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे
- लिफ्ट व एस्कलेटरची सुविधा
- दिव्यांगांसाठी विशेष रॅम्प
- सौरऊर्जेवर आधारित दिवे, सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा
- पावसापासून संरक्षण करणारी छतयुक्त रचना
- मेट्रो स्थानकाशी थेट जोडणी, दोन जिने बांधले जाणार
नागरिकांच्या अडचणी आणि अपेक्षा
या भागांतील नागरिकांनी अनेक वेळा सुरक्षित पुलाची मागणी केली होती. पिंपळे सौदागर, संत तुकारामनगर, भोसरी व नाशिक फाट्याजवळील रहिवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व नोकरदार वर्ग यांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागत होता.
शहराच्या विकासातील आणखी एक पाऊल
पिंपरी चिंचवड महापालिका आणि मेट्रो प्राधिकरणाच्या संयुक्त सहकार्याने हा महत्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात येत आहे. हा पादचारी पूल म्हणजे केवळ सुविधा नव्हे; तर शहराच्या सुव्यवस्थित आणि समावेशक विकासाचे उदाहरण आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण घटेल. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रभावी वापर होईल, अशी अपेक्षा आहे.
स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया
आम्हाला दररोज बीआरटी मार्ग ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो. पुलामुळे हा त्रास नक्कीच कमी होईल.
- सुनंदा गायकर, पिंपळे सौदागर
माझ्या मुलीला महाविद्यालयाला जाण्या-येण्यासाठी मेट्रोने प्रवास करावा लागतो. पण, तिला स्थानकापर्यंत पोहोचविताना काळजी वाटते. आता पुलामुळे ती सुरक्षित पोहोचेल.
- संदीप काळगे, भोसरी
उन्नत पादचारी पुलाच्या कामास सुरूवात झाली आहे. काही महिन्यांतच हे काम पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे शहरातील वाहतूक कमी होऊन पिंपरी चिंचवडकरांच्या सुख-सुविधेसह सौंदर्यात भर पडेल.
- संदीप बोळे, विभागीय अभियंता, महामेट्रो