देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार; स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार

water taxi
water taxiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली.

water taxi
Mumbai : 15 वर्षात रस्त्यांवर 21 हजार कोटींचा खर्च; तरीही मुंबई खड्ड्यात..

मंत्री राणे आणि स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांची ई-वॉटर टॅक्सीबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी श्री. ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राणे यांनी सांगितले की, मुंबई महानगरामध्ये वाहतूक यंत्रणेवर ताण येत असून ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. स्वीडनच्या कँडेला कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांनी नागरिकांची सुरक्षितता, वातावरण, पर्यावरण यांचा विचार करावा. शिवाय वॉटर टॅक्सीचे नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत. कंपनीला लागणाऱ्या परवान्याबाबत राज्य शासन दक्षता घेईल.

water taxi
Mumbai : 'जेएनपीए' ते चौक सहापदरी प्रवेशनियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गास मंजुरी; 4500 कोटींचे बजेट

ओस्टबर्ग महाराष्ट्रातील पोर्टच्या विकासात स्वारस्य दाखवित म्हणाले की, स्वीडनची कॅंडेला कंपनी येवून सर्व माहितीचे सादरीकरण करेल. त्यानंतर वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करू. महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देवू इच्छित असल्याचे सांगितल्याने मंत्री राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली. स्वीडन कंपनीने राज्य शासनाला पोर्टच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करावा. वाहतुकीसाठी सुलभ ठिकाणांची पाहणी करून देशात एक नंबर होईल, असे मॉडेल पोर्ट विकसित करावे. यासाठी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून एप्रिलमध्ये पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. ओस्टबर्ग यांनी पोर्टचा विकास, स्वच्छता, सोयी-सुविधा, गुंतवणुकीबाबतची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com