
वाकड (Wakad) : पावसाने उघडीप देऊन आठ दिवस उलटले तरीही ताथवडे भुयारी मार्गात तब्बल पाच फूट पाणी आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने हा मार्ग वाहतूक पोलिसांनी सोमवारी (ता. २) वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक पुनावळे मार्गे वळविली. मात्र, तेथील भुयारी मार्गाचीही उंची कमी असल्याने तेथील कोंडीत आता ताथवडेतील लाखो वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे पुनावळ्याच्या कोंडीत तिप्पटीने वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ताथवडे येथील सेवा रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. भुयारी मार्गाची कमी उंची ही गंभीर समस्या आहेच. याशिवाय महापालिका अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व बांधकाम व्यवसायिकांना त्यांचे असलेले अभय यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठे टॉवर्स व मॉल्सचे बांधकाम करताना जुने नळकांडी पूल बुजविण्यात आले.
त्यानंतरही महापालिका अभियंत्यांना परिपूर्ण व सक्षम सांडपाणी व्यवस्था उभारण्यात सपशेल अपयश आले. त्यामुळेच पावसाचे पाणी कमी आणि मैला - सांडपाणी अधिक अशी स्थिती आहे. भुयारात ते बाराही महिने साठते. ही समस्या आताची नसून गेल्या अनेक वर्षांपासूनची असूनही अधिकारी सुस्त आहेत.
सांडपाणी वाहिनी तुंबल्यावर मैला व सांडपाणी कायम साचते. या पाण्यात पावसाच्या पाण्याची भर पडली की, परिस्थिती आणखी वाईट होते. अलीकडेच भुयारी मार्गात महापालिकेने नवीन चेंबर बांधले. मात्र जमिनीच्या पातळीपेक्षा ते चेंबर वर असल्याने त्यातून पाण्याचा निचरा होत नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात देखील परिस्थिती गंभीर बनली होती.
आता पाऊस थांबला आहे. मात्र पुढे मोठा पाऊस आहे, असे असतानाही महापालिका अधिकाऱ्यांनी कुठलीही हालचाल केलेली नाही. सोमवारी सकाळी मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी पाणी काढण्याची लगबग सुरू केली.
सेवा रस्त्यालाही मुहूर्त नाही
महामार्गालगतच्या सेवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिका भूसंपादन करत आहे. प्रत्यक्षात रुंदीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) करणार आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यालाही मुहूर्त लागत नसल्याने या भागांतील वाहतूक समस्या अतिशय जटील बनली आहे.
गेल्या महिन्यात महापालिका अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येबाबत चार ते पाच वेळा पाहणी दौरा केला. त्याचा दाखला देत एनएचआयने महापालिकेने पाऊस व सांडपाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची पत्राद्वारे विनंती केली होती.
पाच दिवसांपासून भुयारी मार्गातील पाणी काढण्यासाठी ‘सारथी’वर रोज शेकडो तक्रारी गेल्या. अधिकाऱ्यांना विनंती केली गेली. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर वाहतूक पोलिसांनी वैतागून हा भुयारी मार्ग बंद केला. त्यानंतर महापालिकेचे वराती मागून घोडे सुरू झाले. जनतेस वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत
- देवेंद्र पवार, स्थानिक रहिवासी, ताथवडे
या समसस्येबाबत महापालिका व महामार्ग प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करूनही गांभीर्याने घेतले जात नाही. आमचे दोन अधिकारी चार अंमलदार, वॉर्डन, स्थानिक तरुण व तेथील ४ ते ५ रिक्षावाले मदतीला घेऊनही कोंडी निघत नाही. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून वाहने निघत नाहीत. अनेकजण अपघातग्रस्त होतात. त्यामुळे बॅरिकेडस् लावून भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. पुनावळे मार्गे येथील वाहतूक वळविली आहे.
- सुनील पिंजण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग
भुयारी मार्गात सांडपाणी येत नाही. मागे झालेल्या पावसाचेच हे पाणी आहे. शेतीतून येणारे पाणी इथे साठते. रस्त्याने वाहणारे पाणी ड्रेन करून ते पाणी सांडपाणी वाहिनीद्वारे पुढे जाण्यासाठीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाला दोन दिवस लागतील. त्यानंतर भुयारी मार्गात पाणी साचणार नाही. हे काम करता यावे म्हणूनच वाहतूक पोलिसांना सांगून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
- देवाण्णा गट्टूवार, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका