
मुंबई (Mumbai) : राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. हे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणण्याचे काम दोन वर्षापासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर आणण्यात येतील. शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उंबरठा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.