
मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वे मार्गवर धावणाऱ्या मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत सुपरस्टार एक्सप्रेसला गुरांची धडक होऊ नयेत म्हणून कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत दरम्यान धातूचे कुंपण घालण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात रेल्वेकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरस्टार एक्सप्रेसला सतत गुरांची धडक होण्याचा घटना घडत होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. रेल्वे रुळावर येणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुमारे ६२२ किमी लांबीचे धातूंचे कुंपण घालण्याचे काम सुरु केले असून त्याला सुमारे अडीशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात १० फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून मोठ्या थाटात केली. मात्र,आता या आलिशान गाडीत तांत्रिक बिघाड आणि प्रवाशांच्या तक्रारीचे सत्र सुरू झाले आहे. रविवारी वंदे भारत ट्रेनचे सॉफ्टवेअर फेल झाल्याने ठाणे आणि दादर स्थानकांवर दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना गार्ड कॅबिनमधून उतरविण्याची नामुष्की रेल्वेवर आली होती.
परंतु, आता दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसला गुरे धडकण्याची भीती रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कल्याण, कसारा आणि कर्जत विभागात सतत गुरांची वर्दळ असते. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसला गुरे धडकल्यास रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम होऊ शकते, इतकेच नव्हेत तर रेल्वे गाडी रेल्वे रुळावरून घसरण्यासह रेल्वे अपघातांची शक्यता आहे, त्यामुळे रेल्वे मार्गावर येणाऱ्या गुरांच्या बंदोबस्तासाठी कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत दरम्यान धातूचे कुंपण घालण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात रेल्वेकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.