
मुंबई (Mumbai) : केंद्र सरकारकडून पंतप्रधान ई-ड्राईव्ह (PM E-DRIVE) योजनेअंतर्गत १०,००० इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी मे २०२५ मध्ये टेंडर काढले जाणार आहे. देशातील नऊ शहरांसाठी या ई-बस ऑपरेटरची निवड केली जाणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सुरत, अहमदाबाद, नवी दिल्ली आणि कोलकाता या नऊ शहरांमध्ये या बसेस धावणार आहेत.
सरकारी कंपनी एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) च्या उपकंपनी असलेल्या कन्वर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (CESL) मार्फत हे टेंडर काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी सुमारे ३,००० कोटी रुपयांची अनुदान रक्कम दिली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. एका बससाठी सरकारने जास्तीत जास्त ३५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान निश्चित केले आहे.
पंतप्रधान ई-ड्राईव्ह (PM E-DRIVE) ही योजना सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आली असून, यासाठी सरकारने १०,९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे देशात इलेक्ट्रिक वाहनांचा जलद प्रसार करणे, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे आणि ईव्ही उत्पादन क्षेत्राचा विकास करणे असा आहे. ही योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून ३१ मार्च २०२६ पर्यंत राबवली जाणार आहे. योजनेअंतर्गत एकूण १४,०२८ इलेक्ट्रिक बससाठी ४,३९१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.