
मुंबई (Mumbai) : जुहूमध्ये अनधिकृत बांधकामे पाडल्यानंतर आणि म्हाडाने सुमारे आठ एकर भूखंड परत ताब्यात घेतल्यानंतर, स्थानिक भाजप आमदार अमीत साटम यांनी म्हाडाला पत्र लिहून पुनर्प्राप्त केलेल्या भूखंडावर जिल्हास्तरीय ओपन-टू-स्काय सुविधा विकसित करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याची मागणी केली आहे.
फेब्रुवारीमध्ये म्हाडाच्या मुंबई युनिटने २० वर्षांनंतर एका बिल्डरकडून आठ एकरचा जुहू येथील भूखंड परत मिळवला. बिल्डरने खोट्या झोपड्या दाखवून आणि बनावट कागदपत्रे सादर करून हा भूखंड बेकायदेशीरपणे एसआरए योजनेत जोडला होता. हा भूखंड जुहूमधील एका प्रमुख परिसरात ऋतंभरा कॉलेजसमोर आहे. म्हाडाला लिहिलेल्या पत्रात आमदार अमीत साटम यांनी या भूखंडावर जिल्हास्तरीय ओपन-टू-स्काय क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी एनओसीची विनंती केली आहे. न्यायालयाने सर्व कायदेशीर अडचणी दूर केल्यानंतर विकास आराखड्यानुसार आरक्षण आणि टिपणीनुसार नागरिकांच्या हितासाठी या भूखंडावर जिल्हास्तरीय ओपन-टू-स्काय क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी एनओसी द्या, असे आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे.
साटम यांनी बीएमसीच्या विकास आराखड्यात ह्या जमिनीच्या भूखंडावर दर्शविलेल्या आरक्षणाकडे म्हाडाचे लक्ष वेधले आहे. जुहूमधील ऋतंभरा कॉलेजसमोर असलेली म्हाडाने अलीकडेच ताब्यात घेतलेली ३१,००० चौरस मीटर जमीन खुली जागा तसेच रस्ता म्हणून राखीव आहे. मी या भूखंडासाठीची विकास आराखड्याची टिपणी सोबत जोडत आहे, असे आमदार अमित साटम यांनी नमूद केले आहे. आमदार अमित साटम आणि स्थानिक रहिवाशांच्या सततच्या प्रयत्नांमुळे बिल्डरने झोपडपट्ट्यांबद्दल केलेले खोटे दावे उघड करण्यात - गुगल इमेजेस आणि शासकीय रेकॉर्ड वापरून - भूखंड परत मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्हास्तरीय ओपन-टू-स्काय क्रीडा सुविधेमुळे नागरिकांना आणि तरुणांना क्रीडा क्षेत्रातील त्यांची आवड जोपासण्यास मदत होऊन त्यांचा मोठा फायदा होईल, असे आमदार साटम पुढे म्हणाले.