

मुंबई (Mumbai): भिवंडी तालुक्याच्या दळणवळण आणि औद्योगिक प्रगतीला मोठी गती देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, मुंबई-वडोदरा महामार्गावर लामज येथे एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट उभारण्याच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
स्थानिक नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आणि भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच १३२.२८ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे भिवंडीकरांना थेट महामार्गाचा वापर करता येणार असून, परिसरातील पायाभूत सुविधांच्या जाळ्याचा खऱ्या अर्थाने विस्तार होणार आहे.
मुंबई-वडोदरा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी महामार्ग भिवंडी तालुक्यातून जात असला, तरी स्थानिक प्रवाशांना या मार्गावर चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी जवळच्या अंतरावर कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. ही अडचण ओळखून स्थानिक संघर्ष समितीने खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडे या विषयाचा पाठपुरावा केला होता.
खासदार बाळ्या मामा यांनी या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली दरबारी जोरदार हालचाली केल्या. त्यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लामज येथे एन्ट्री-एक्झिट पॉईंट असणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या किती गरजेचे आहे, हे पटवून दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मागणीवर सकारात्मकता दर्शवत तत्काळ निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते, ज्याची पूर्तता आता निविदा प्रक्रियेद्वारे झाली आहे.
या एन्ट्री-एक्झिट सुविधेमुळे केवळ प्रवास सुखकर होणार नाही, तर भिवंडीतील औद्योगिक क्षेत्रासाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. भिवंडी हे गोदाम आणि लॉजिस्टिक हब म्हणून ओळखले जाते. महामार्गावर थेट प्रवेश मिळाल्यामुळे अवजड वाहतूक आणि मालवाहतूक अधिक वेगाने होऊ शकेल, ज्यामुळे वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होईल. पायाभूत सुविधांच्या या विस्तारामुळे नवीन उद्योगांना चालना मिळेल आणि स्थानिक रोजगार वाढण्यास मदत होईल.
याबद्दल बोलताना खासदार सुरेश म्हात्रे यांनी आनंद व्यक्त केला असून, नितीन गडकरी यांनी भिवंडीकरांच्या भावनेचा सन्मान करून विकासाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.