

नाशिक (Nashik) : पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) तसेच राज्यशासन पुरस्कृत विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील तब्बल ७५ हजार घरकुल लाभार्थी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी दुपारी १२ वाजता एकाचवेळी गृहप्रवेश करणार आहे.
जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून एकाचवेळी गृह प्रवेश हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान घरकूल योजना व राज्यसरकार पुरस्कृत घरकुल योजनेतून १ लाख ६४ हजार घरकूल मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यातील ५२ हजार घरकूलांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित २३ हजार घरकुलांची कामे पुढच्या दोन चार दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माहितीनुसार, या ७५ हजार घरकुलांपैकी ५१ हजार घरकुले पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पूर्ण करण्यात आली असून उर्वरित २४ हजार घरे ही राज्यशासन पुरस्कृत विविध शासकीय योजनांमधून साकार झाली आहेत.
या योजनांचा लाभ अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जमाती, अल्प उत्पन्न गट, विधवा महिला, दिव्यांग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, पंचायत राज संस्था व ग्रामपंचायती यांच्या समन्वयातून घरकुल कामांना गती देण्यात आली असून आज त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
आगामी काळातही उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सुपूर्द करून गृहप्रवेश करण्यात येणार आहे.
प्रजासत्ताकदिनी नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार कुटुंबे त्यांच्या हक्काच्या घरात पहिले पाऊल टाकत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी म्हटले आहे.