Sambhajinagar : अहिल्याबाई होळकर चौक ते देवळाई रस्त्यावर वाहन चालकांचा जीव का आला धोक्यात?

Sambhajinagar
SambhajinagarSambhajinagar

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सात कोटी रुपये खर्च करून सातारा ते देवळाई कालिका कंन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत तयार झालेला चकचकीत रस्ता जीव्हीपीआर कंपनीकडून नवीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी होत्याचा नव्हता करण्यात आला. भर पावसाळ्यात येथील रस्ता खोदून जलवाहिनी टाकण्यात आली होती. दरम्यान सहा महिने उलटून गेल्यानंतरही रस्ता पूर्ववत करण्यात आला नाही. धक्कादायक बाब म्हणजे खोदलेल्या तीस ते चाळीस फूट खड्ड्यातील जलवाहिनीचे जाॅईंट जोडण्यासाठी साहित्य नसल्याचे म्हणत कंत्राटदाराने असुरक्षित खड्डे उघडेच ठेवले आहेत. या खड्ड्यांभवती सावधानतेचा इशारा देणारे फलक लावले नाहीत. कंत्राटदाराची ही बेपर्वाई कुणाचा तरी बळी घेऊ शकते.

Sambhajinagar
Nashik : झेडपीने जलजीवनच्या ठेकेदारांचे 150 कोटी थकवले; 50 टक्के कामे करूनही केवळ 444 कोटींची देयके

महानगरपालिकेत समावेश होण्याआधी सातारा - देवळाई भागात छोटीशी ग्रामपंचायत होती. करदात्यांना सोयीसुविधा मिळत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभाग तर कधी नाबार्ड तर कधी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विविध निधीतून रस्त्यांची कामे होत होती. सातारा - देवळाई गावठाणातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा केला जात होता. ग्रामपंचायत रस्ते छान गुळगुळीत करत होती. विशेषतः देखभाल दुरुस्तीसाठी देखील तत्पर राहत असे. पण सातारा - देवळाईचे महानगरपालिकेत हस्तांतरण झाले आणि पार वाटोळे झाले. या भागातील आमदार संजय शिरसाट यांनी सातारा - देवळाईसाठी भरघोस निधी खेचून आणला. मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे झाली.

त्यांच्याच प्रयत्नांमुळे सातारा ते अहिल्याबाई होळकर चौक ते देवळाई रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. यासाठी जवळपास सात कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. २०१४ - १५ मध्ये या रस्त्यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने टेंडर निघाले होते. छत्रपती संभाजीनगर येथील कालिका कंन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांपुर्वी छत्रपती संभाजीनगर शहर नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीच्या कामासाठी जीव्हीपीआर कंपनीने हा रस्ता खोदून होत्याचा नव्हता करण्यात आला आहे. मार्गावर खोदण्यात आलेले खड्डे असुरक्षित असून तिथे वाहन चालकांना सावधानतेची सूचना देणारे फलक देखील लावण्यात आलेले नाहीत. पावसाळा सुरू होण्यापुर्वी कंत्राटदाराने रस्ता खोदून जलवाहिनी टाकली. त्यामुळे भरपावसाळ्यात नागरिकांना दलदलीचा सामना करावा लागला. जेष्ठ नागरिक महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले.

Sambhajinagar
Sambhajinagar : बीड बायपास देवळाई चौक ते सोलापूर हायवे रस्ता बघा कुणामुळे रखडला?

मुळात जीव्हीपीआर आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या करारनाम्यात टेंडरमध्ये जलवाहिनीसाठी खोदलेले रस्ते काम झाल्यानंतर "जैसे थे" करून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असल्याचे त्यात ठळकपणे नमूद करण्यात आलेले आहे. यासाठी केंद्राच्या अमृत -२ योजनेंतर्गत मोठा निधीही कंत्राटदाराला दिला आहे. मात्र रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी मंजूर असताना कंत्राटदाराकडून रस्ते त्वरित पुन्हा गुळगुळीत केले जात नाहीत.

सातारा ते अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा काॅलनी ते देवळाई या अरूंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट वसाहती आहेत. अनेक विकासकांनी मोठमोठे गृहप्रकल्प उभारलेले आहेत. दरम्यान याच रस्त्याकडे पाहून नागरिकांनी सातारा - देवळाई रस्त्यालगत प्लॉट, फ्लॅट घेतले. सोसायट्या स्थापन केल्या. अनेक वर्षे या भागातील नागरिकांनी रस्त्यांचा प्रश्न सुटावा यासाठी  अनेकवेळा आंदोलन केले, तेव्हा हा रस्ता गुळगुळीत केला गेला. तो रस्ता देखील आता जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने होत्याचा नव्हता करून टाकला. परिणामी शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणे कठीण होत आहे. जेष्ठ नागरिक आणि महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. रस्त्याअभावी या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com