Sambhajinagar : बीड बायपास देवळाई चौक ते सोलापूर हायवे रस्ता बघा कुणामुळे रखडला?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील महापालिका हद्दीतून जाणाऱ्या व छत्रपती संभाजीनगरसह पैठण तालुक्याला जोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, देवळाई, भिंदोन, गाडीवाट, कचनेर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-३५च्या मार्गावरील सोलापूर-धुळे ते साई टेकडी या जवळपास साडेतीन किलोमीटर रस्त्याचा नूर पालटला. मात्र बीड बायपास ते देवळाईगाव ते सोलापूर - धुळे हा एकूण साडेतीन किलोमीटरचा रस्ता महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेचा कंत्राटदार जीव्हीपीआर तसेच महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रखडल्याचे टेंडरनामा तपासात उघड झाले आहे.

Sambhajinagar
Nashik : झेडपीने जलजीवनच्या ठेकेदारांचे 150 कोटी थकवले; 50 टक्के कामे करूनही केवळ 444 कोटींची देयके

टेंडरनामाची वृत्तमालिका आणि ससतच्या पाठपुराव्याने पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी खेचून आणला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. दहा किलोमीटर दुरुस्तीसाठी काढलेल्या टेंडरमध्ये जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर, जे. पी. कन्स्ट्रक्शन, व्ही. पी. सेठ्ठी, पी. एस. बागडे आदी चार कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यात सर्वांत कमी टक्के दराने टेंडर भरणाऱ्या जीवनात इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आले होते.

दरम्यान या कंपनीला काम मिळताच टेंडरनामाने बीड बायपासच्या चुकीच्या आणि काम सुरू असतानाच रस्ता उखडल्याचे बिंग फोडले होते. आमदार शिरसाट यांनी कंत्राटदार जीएनआय कंपनीला देवळाई रस्त्याबाबत कडक सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या रस्त्यावर कुठेही क्रॅश नाही, आरपार भेगा पडल्या नाहीत. सरफेस देखील खरबडला नाही. वाहन चालवताना चढ उतार जानवत नाही. पावसाचे पाणी साचू नये यासाठी रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूला उतार दिल्याने रस्त्याचे आयुष्य देखील वाढणार आहे. याशिवाय जुने नळकांडे पूल तोडून नवे आयसीसी पूल बांधल्याने पावसाळ्यात लोकांचा मार्ग सुखकर झाला आहे. या रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रवाशांनी देखील स्तुती केली आहे.

शहरातील बीड बायपास देवळाई चौक ते देवळाई तसेच साईटेकडीपर्यंत जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळणी हाेऊन माेठमाेठे खड्डे पडले होते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माेठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत. या भागात नवीन वसाहतींमध्ये सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे हाल हाेत होते. याच रस्त्यावर प्रसिद्ध शाळा, महाविद्यालये तसेच एमजीएम विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालये व राज्यस्तरीय सरपंच प्रशिक्षण केंद्र तसेच कृषी विद्यापीठ आणि साई टेकडीचा समावेश आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे साई टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांना व पर्यटकांसह पंचक्रोशीतील शेकडो गावकऱ्यांना खड्ड्यांमुळे व त्यात साचलेल्या डबक्यांमुळे माेठा त्रास सहन करावा लागत होता.

Sambhajinagar
Mumbai : सरकारने दिली गुड न्यूज! मुंबईतील 'त्या' इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

पावसाळ्यात तर खड्ड्यात पाणी भरल्याने खड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना जीवघेण्या अपघाताला सामोरे जावे लागत होते. टेंडरनामाने या रस्त्याची झालेली खड्डेमय अवस्था आणि त्यामुळे लाखो वाहनचालकांना सोसावा लागणारा त्रास यावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उबाठा सरकारच्या काळात या १० किमी रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले होते. परंतु, उबाठा सरकार कोसळताच शिंदे सरकारने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला ग्रहन लागले होते. परंतु, हा रस्ता तयार करावा, अशी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार संजय शिरसाट यांनी सातत्याने पाठपुरावा करून शिंदे सरकारकडून  ३५ कोटी रुपये मंजूर केल्याने नागरिकांत आनंदोत्सव साजरा झाला होता. 

एकीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ बीड बायपास आणि दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - एन एच -५२ सोलापूर - धुळे महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या मार्गावर छाेट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर छोटे-मोठे अपघातही हाेतात. तसेच, सततच्या वाहतूक काेंडीमुळे नागरिक त्रस्त होते. विशेष म्हणजे शनिवार, रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी साई टेकडीवर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावर खड्डे असल्याने पर्यटकांनाही माेठा त्रास सहन करावा लागत होता.

यापुर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ५०५४-०१०६ जिल्हा व इतर मार्ग या लेखाशिर्षाखाली एक कोटी ९१ लाख ४७ हजार ४१२ रुपयांना तांत्रिक मान्यता मिळाली होती. ४ टक्के कमी दराने टेंडर भरणाऱ्या चारनिया कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. त्यात या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्ताखाली संपूर्ण काळीमाती असल्याने तसेच महापालिका हद्दीत येणाऱ्या या रस्त्यावर कुठेही स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा नसल्याने शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट वसाहतीचे सांडपाणी रस्त्यावरच येत असल्याने चार वर्षातच हा नवीन तयार केलेला रस्ता उखडल्याने नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागत होती. हा रस्ता कचनेर येथील जैन मंदिराकडे जातो. त्यामुळे तेथे जाणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागत होता. पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप येते. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही हाेतात. या परिसरात सध्या ६० पेक्षा अधिक वसाहती आहेत.

Sambhajinagar
Nashik : दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी वितरणात 'समाजकल्याण'ची मनमानी; चेहरे बघून दिला निधी?

या प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४० पेक्षा अधिक सोसायट्या आहेत. या रस्त्यावर रॉयल ऑक्स इंग्लिश स्कूलसह छोट्या-मोठ्या १५ पेक्षा अधिक शाळा, एमजीएम कृषी विद्यापीठ, साई टेकडी, साई मंदिर, कचनेर जैन मंदिर आहे. तसेच, सोलापूर हायवेसुद्धा या रस्त्याला जोडलेला आहे. त्यामुळे बीड बायपासकडून सोलापूर हायवेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या माेठी आहे. या रस्त्याचा सखल भाग आणि आजुबाजुला दाट वसाहती आणि स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेचा अभाव त्यामुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी देवळाई चौक ते साईटेकडीपर्यंत आठ किलोमीटरवर तसेच पुढे दोन किलोमीटर गांधेली फाट्यापर्यंत हा सिमेंट रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी ग्रामस्थ आणि पर्यटकांसह शहरी हद्दीतील नागरिकांना या पक्क्या रस्त्यामुळे कायमची गैरसोय दूर होणार आहे.

दरम्यान सोलापूर - धुळे महामार्ग ते साईटेकडी या रस्त्याचे रुंदीकरणासह व पूल व मोत्यांच्या बांधकामासह सिमेंट रस्त्याने पर्यटक, साईभक्त व ग्रामस्थांना भूरळ घातली आहे. मात्र सोलापूर - धुळे ते देवळाई गाव ते जुना बीडबायपास शहरी हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर भविष्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच पुन्हा रस्त्याचे खोदकाम होऊ नये यासाठी आमदार संजय शिरसाट यांनी या संपूर्ण रस्त्याचे नियोजन केले आहे. रस्त्याच्या कामात नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम खोळंबले आहे.

तर दुसरीकडे महावितरण कंपनीचे व महानगरपालिकेचे विद्युत खांब आडवे येत आहेत. या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी शिरसाटांकडून पत्रव्यवहार सुरू आहे. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्यासमवेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे अधिकारी व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील शिरसाट यांनी लावली होती. मात्र, अद्याप संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रस्त्याचे काम रखडल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com