Sambhajinagar : स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराचा रस्ते कामात हलगर्जीपणा

Road
RoadTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील स्मार्ट सिटीच्या रस्ते विकासकामातील भ्रष्ट कारभार थांबण्याचे नाव घेत नसून, विकासकामातील अनियमितता व चुका दिवसेंदिवस "टेंडरनामा"च्या तपासात उघड होत आहेत. शहरातील जालना रस्त्याला समांतर असलेल्या लक्ष्मण चावडी ते कैलासनगर स्मशानभूमीच्या बाजूला नुकत्याच केलेल्या अंतर्गत रस्त्याच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा करत काम अर्धवट ठेवले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

Road
Sambhajinagar : अवकाळी पावसाने उघड केला 'या' रस्ते कामातील कोट्यवधींचा घोटाळा

अनेक ठिकाणी एक्सपांशन गॅप तसेच ठेवल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान होत असून, या मार्गावर दररोज किरकोळ अपघात होत असल्याचे नागरिकांकडून कळाले. धक्कादायक बाब म्हणजे. रस्त्याच्या मधोमध दुभाजकासाठी असलेल्या नालीत भरती करण्यासाठी चक्क जुनाट बांधकाम साहित्याचा मलबा आणून ढिगारे लावण्यात आली आहेत. महावितरण व महापालिकेचे विद्युत खांब अन् रोहीत्रे रस्त्याच्या मधोमध ठेऊन घाईगडबडीत काम उरकताना अपघातासाठी यमदूत तसेच ठेवण्यात आले आहेत. कारभाऱ्यांनी देखील जनमाहिती अधिकाराला धाब्यावर ठेवत चुकीचा माहिती फलक लाऊन मागासलेपणाचा कळस गाठला आहे. सिमेंट रस्ता उंच झाल्याने नागरिकांच्या अंगणात अवकाळी पावसाचे व वाहून आलेले अस्वच्छ पाणी साठले आहे. त्यामुळे ही विकासकामे आहेत की मागासलेपणाची कामे आहेत, असा प्रश्न आता नागरिकांत निर्माण होऊ लागला असून संबंधित कंत्राटदारावर व संबंधित प्रकल्प व्यवस्थापकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Road
Mumbai : बीएमसीच्या 'त्या' टेंडरमध्ये मर्जीतील कंत्राटदारासाठी रेड कार्पेट; पुन्हा Tender Scam ?

स्मार्ट सिटीतील प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, आयआयटीचे तांत्रिक तपासणी पथक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष्मण चावडी ते कैलासनगर स्मशानभूमीच्या सिमेंट रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत डोळेझाक केली आहे. त्याचा परिणाम म्हणजे याच मार्गावर असलेल्या कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणार्या नागरिकांना मोठा फटका बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे जनमाहिती अधिकारांतर्गत फलकावर रस्त्याचे नाव, रस्त्यासाठी होत असलेल्या निधीचा संपूर्ण तपशिल, काम सुरू करण्याचा व काम पूर्णत्वाचा व काम पुर्ण झाल्यानंतर दोष निवारण कालावधीचा दिनांक व रस्ते बांधकामाचा संपुर्ण तपशिल, तसेच कंत्राटदार एजन्सीचे नाव, प्रकल्प सल्लागाराचे नाव व रस्ते कामाकडे जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक फलकावर लिहिण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्याबाबत माहिती दडवण्याचा प्रयत्न कारभाऱ्यांनी केला आहे.

Road
Mumbai : 'धारावी पुनर्विकास' टेंडरमध्ये सरकारचे मोठे नुकसान; 'या' कंपनीचा उच्च न्यायालयात दावा

यापूर्वी वादातीत ठरलेला लक्ष्मण चावडी ते कैलासनगर स्मशानभूमी रस्त्यावरील काही बड्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण न काढता निकृष्ट दर्जाचा व कमी अधिक लांबी रुंदी असणारा रस्ता तयार केला आहे. आता नुकत्याच केलेल्या या अंतर्गत रस्त्याच्या वाढीव उंचीने किरकोळ पावसातदेखील पाणी नागरिकांच्या अंगणात साठले आहे. जोरदार पाऊस झाल्यास हे पाणी घरात घुसण्याची शक्यता आहे.तसेच रस्ते विकासकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असताना देखील कारभार्यांनी आजपर्यंत याची साधी चौकशी देखील केलेली नाही. कार्यारंभ देणारे, नियोजित प्रकल्प आराखडा मंजूर करणारे, बिले काढणारे सर्वच अभियंता यात दोषी असून कंत्राटदाराला बिले अदा केली जात आहेत. स्मार्ट सिटीचे सीईओ तथा महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी याकडे लक्ष घालून बेकायदा मनमानी कामे करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे तसेच भ्रष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकावे  व अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.कंत्राटदाराकडुन नियम धाब्यावर बसवत रस्ता तयार केला आहे. बांधकाम विभागाने मंजुरी दिलेल्या व कामे पूर्ण झालेल्या अनेक कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे. तक्रारी असतानाही कामांची बिलेदेखील अदा केली जात असल्याने सर्वांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन उभारले जाईल, अशा इशारा देखील कैलासनगरवासीयांतर्फे देण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com