Sambhajinagar : मुकुंदवाडीत विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर कधी दाखल होणार गुन्हा?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या मुकुंदवाडी कब्रस्तानात दोन महिन्यांपूर्वी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी अनेक वृक्षांची कत्तल केली. याचा सुगावा लागताच नारेगावचे माजी नगरसेवक मनिष दहिहंडे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांना वृक्षांची निर्दयीपणे कत्तल करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

Sambhajinagar
Nana Patole : विखे पाटील साहेब, 'त्या' कंपनीकडून होणारी नागरिकांची लूट थांबवणार की नाही?

कागदी घोड्यात अडकली कारवाई

त्यानंतर महापालिकेतील स्वच्छता निरीक्षकाने अहवाल सादर केला. उद्यान विभागातील कृषी अधिकाऱ्यांने पंचनामा तयार केला. त्यात विनापरवानगी वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट लिहीत महापालिकेच्याच उद्यान विभागातील एका कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून वृक्षतोड झाली आणि महापालिकेच्याच कचरा संकलन करणाऱ्या वाहनातून लाखो रूपयांच्या लाकूडफाट्याची विल्हेवाट लावण्यात आली. यात कर्मचाऱ्यांंच्या नावासह अहवालात नमुद केले आहे. मात्र, उद्यान विभागातील अधिकारी खुलाशाची वाट पाहात कागदी घोडे नाचवत कारवाईला लगाम देत आहे. यामुळे वृक्षतोड कुण्या मोठ्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून झाली आहे का, त्याला वाचवण्यासाठी कुणाचा राजकीय दबाबापोटी चालढकल सुरू आहे, असा संशय तक्रारदार दहीहंडे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पर्यावरण विभाग म्हणतो, परवानगी बंधनकारकच

एकीकडे देशपातळीवर वृक्षांची महती सांगत केंद्र व राज्य सरकारने वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही  विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.  त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी जरी एखादे झाड तोडणे गरजेचे असले अथवा वृक्ष छाटणी करावयाची असेल तरी त्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे बंधनकारक केले आहे.

Sambhajinagar
Ajit Pawar : वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी पाठपुरावा करणार

कायदा बगलेत ठेवून अधिकाऱ्यांनीच केला कारनामा

सरकारी कायदा बगलेत ठेवून अधिकाऱ्यांनीच एका खाजगी कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून विनापरवानगी वृक्ष तोड केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कब्रस्तान ही सरकारी जागा असून महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आहे. अशा सरकारी जागेवरील बाधीत झाडे तोडावयाची असल्यास महापालिका वृक्ष जतन व संवर्धन समिती मार्फत पाहाणी करून झाडे तोडण्याबाबत निर्णय घेते. त्यानंतर वृक्ष अधिकारी कार्यालयामार्फत आक्षेप मागविले जातात. व त्यानंतर  टेंडर प्रसिद्ध करून स्पर्धेत यशस्वी झालेल्या कंत्राटदाराकडून वृक्षतोड केली जाते.

मग हे कोट्यवधींचे प्रयोग कशासाठी
विशेष म्हणजे जगभरात तापमानवाढीची चिंता व्यक्त करत वातावरणातील बदल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरण संतुलनासाठी व्हर्टिकल गार्डनची संकल्पना पुढे आली .केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा प्रकल्पांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी, प्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच रस्त्यांवर हवेत पसरणारे धुलीकन कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात कोट्यवधींचे टेंडर काढून महापालिकेने व्हर्टिकल गार्डनचे प्रयोग केले. या प्रयोगावर कोट्यावधींची उधळण केली. प्रयोग मात्र अद्याप अर्धवट आहेत.एकीकडे शहरातून वाहणाऱ्या नाल्यांवर, उड्डाणपूलांच्या भिंतींवर जाळी लावून त्यावर झाडांच्या कुंड्या अडकवल्या पण त्यांची निगा राखणे तर दुरच दुसरीकडे चांगली जीवंत झाडे तोडून महानगरपालिका अधिकाऱ्यांनी संगणमताने पर्यावरणाचा ऱ्हास केला असताना महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्याकडून दोषींवर कारवाई करण्यास दोन महिन्यांपासून चालढकल सुरू आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : 'या' रेल्वे स्टेशनकडे 'दमरे'चा कानाडोळा; सोयीसुविधांचा दुष्काळ, प्रवाशांचे हाल

जिवंत झाडांचा बळी गेला त्याच काय?

विशेष म्हणजे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी १२ सप्टेंबरला महापालिकेतील उद्यान अधिकाऱ्यांना एक विशेष आदेश जारी करत शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. जे लोक किंवा संस्था विविध प्रकारच्या जाहिराती करण्यासाठी रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडांना खिळे ठोकून प्रसिध्दी करण्याचे प्रकार करत असतील अशा लोकांवर एफ.आय.आर. दाखल करायचे लेखी आदेश जी. श्रीकांत यांनी काढले होते. यात त्यांनी खिळे ठोकल्याने झाडांचे आयुष्य कमी होते, असा उल्लेख केला होता. दरम्यान काही लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. मात्र ज्यांनी चांगल्या जीवंत झाडांचा बळी घेतला त्या संबंधितांवर गत दोन महिन्यांपासून कारवाईची मागणी करणार्या माजी नगरसेवकांच्या पत्रांना केराची टोपली का दाखवली जात आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे.

विनापरवानगी वृक्षतोड/वृक्षछाटणी करून पर्यावरणाला हानी पोहचविणे हा गुन्हा असून याबाबत यापूर्वी अदखलपात्र गुन्हा (N.C.) नोंदविला जात होता. मात्र आता याबाबत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. त्या अनुषंगाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी मुकुंदवाडी कब्रस्तानात सरकारी जागेवर विनापरवानगी चांगली पाच वृक्ष बुडापासून तोडून एका वृक्षाची छाटणी करणाऱ्यांवर नियमानुसार दखलपात्र गुन्हे (F.I.R.) नोंद करण्याचे निर्देश संबंधित वृक्ष अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित आहे. त्यानुसार वृक्ष अधिकाऱ्यांने महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम 2009 सह सरकारी आदेश अधिसूचनामधील कलम 21(1) व 2 नुसार विनापरवानगी पाच जीवंत झाडांची कत्तल आणि एका झाडाची छाटणी करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. परिणामी अशाप्रकारे विनापरवानगी वृक्षतोड/वृक्षछाटणी करणाऱ्यांवर महापालिका दखलपात्र गुन्हे नोंदवित नसल्याने असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर वचक राहत नाही. यासाठी  पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महापालिकेने कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com