Sambhajinagar : 'या' रेल्वे स्टेशनकडे 'दमरे'चा कानाडोळा; सोयीसुविधांचा दुष्काळ, प्रवाशांचे हाल

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

गावेChhatrapati Sambhajinagar News : नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या 'डी' दर्जा प्राप्त मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे दक्षिण मध्य रेल्वे अधिकाऱ्यांचा अद्यापही कानाडोळा असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे स्टेशनच्या पलिकडे राहणाऱ्या रहिवाशांना जीव मुठीत धरून धोकादायक पध्दतीने रेल्वे रूळ ओलांडून जावे लागू नये म्हणून एका तत्कालीन विभागीय व्यवस्थापकाने येथे भुयारी मार्गाची घोषणा हवेतच विरली. त्यात पाच वर्षांपूर्वी केलेल्या १७ कोटींच्या कामाचा पार बोजवारा उडाला आहे. मध्यंतरी टेंडरनामाने यावर प्रहार करताच 'दमरे'ने प्रतिक्षालयातील भंगाराचे गोडाऊन साफ करत तेथे लोखंडी बाकडे टाकले. मात्र इतका खर्च करून प्रतिक्षालय पुन्हा कुलुपबंद करण्यात आले आहे.

Sambhajinagar
आदिवासी विकास विभाग: फर्निचर खरेदीत 62 कोटींचा घोटाळा; लेखा परीक्षणात ठपका

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीवर एकच कर्मचारी असल्याने प्रवाशांना तिकीटासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसले. प्लॉटफॉर्मवरील लाइट बंद असल्याने प्रवाशांचे खिसे कापून चोरट्यांची रोजच दिवाळी साजरी होत आहे. प्लाॅटफाॅर्मवर विश्रामगृहाचे काम करण्यात आलेले आहे. मात्र दमरेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने ते अद्यापही कुलुपबंद आहे. याकडे देखभाल दुरुस्तीचा कालावधी बाकी असताना संबधित कंत्राटदारांने दुर्लक्ष केल्यामुळे विश्रामगृहाचे देखील बारा वाजले आहेत.

रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर कमान उभारण्याचे काम केले त्या कमानीला मोठमोठे भगदाड पडले असून पोस्टरबाजांचा वेढा आहे. कमानीतून आत प्रवेश केल्यावर तुटलेल्या पायऱ्यांवरून प्रवाशांना प्लाॅटफार्म गाठावा लागत आहे. प्लाॅटफार्मवर देखील खड्डे पडल्याने प्रवाशांना चंप्पलतोड आणि अंगठेफोड सोसावी लागत आहे. प्लाॅटफार्मवरील प्रवाशी निवाऱ्यांखाली बाकड्यांची सोय नाही, निवाऱ्यांचे छत देखील तुटके असल्याने पावसाळ्यात पाणी गळती अन् उन्हाळ्यात चटके सोसत प्रवाशांना दाटीवाटीने उभे राहावे लागते.  

स्थानकातील रंगरंगोटी दिसेनाशी झाली. विश्रामगृहात आणि प्लाॅटफार्मवरील लाईट फिटींग फॅन तसेच नळफिटींग व इतर अंतर्गत सोयी सुविधांची चोरी होत असल्याने येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यास रेल्वे प्रशासन नाखुश असल्याचे येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे कुठल्याही स्टेशनवर आवश्यक बाब म्हणून गरजेचे असलेल्या स्वच्छतागृहाची येथे वानवा आहे. केवळ महिला व अपंगांसाठी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह देखील पाच वर्षांपासून कुलुपबंद असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. तर अपंगांचे हाल होत आहे.

Sambhajinagar
Nashik : नाशिक जिल्ह्यात स्मशानभूमी नसलेली गावे 451; मंजुरी केवळ 39 गावांना

भुयारी मार्ग कागदावरच 

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या रूळालगत दक्षिण आणि उत्तर बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. त्या परिसरातील नगरिकांना लोहमार्ग ओलांडून ये-जा करावी लागते. सध्या या भागातील नागरिक दगडी पुलाचा वापर करत असून, तो वापर करणे धोकादायक आहे. दुसरीकडे बाळापूर रेल्वे क्रॉसिंग गेट आहे. पण तिकडून वसाहतींकडे शिरताना मोठा वळसा घालून प्रवेश करावा लागतो.

त्यामुळे ही विदारक स्थिती पाहून दमरेचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक डाॅ. ए. के. सिन्हा यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये रेल्वेच्या बांधकाम विभाग प्रमुखांना तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो रेल्वे बोर्डाकडे त्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. सिन्हा सांगितले होते. मात्र अद्याप या सर्व सुचना कागदावरच आहेत.

सद्यस्थितीत मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनला सध्या ‘डी’ दर्जा आहे. या स्टेशनवर आरक्षण खिडकी आणि तिकीट खिडकीही जरी सुरू करण्यात आली असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करीत असली तरी इकडे पुरेशा मुलभुत सोयी सुविधा नसल्याने तिकीट विक्री व आरक्षणावर परिणाम होत आहे. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. रेल्वे प्रशासनाने येथे प्रवाशांना पुरेपूर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास व एक्स्प्रेस तसेच नवीन रेल्वे गाड्या देखील येथे थांबवण्यात आल्या तर उत्पन्नात वाढ होईल.

उत्पन्न वाढल्यावर पूर्णा रेल्वे स्टेशनसारखा थेट ‘बी’ दर्जा प्राप्त होऊ शकतो. जर या स्थानकांचा दर्जा वाढल्यास या स्थानिकासाठी रेल्वे बोर्डाकडून अधिक निधी प्राप्त होऊन स्थानकाचा कायापालट होऊ शकतो. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर गर्दीत चोरटे संधी साधून मोबाईल चोरी, पॅकेटमार, दागिणे, पर्स चोरणे यासारख्या घटना घडत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसदलाच्या जवानांची गस्त वाढविली जावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com