छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने प्रत्येक विभागात कारभाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. आता उद्यान विभागाने सिडको एन-८ स्व. बाळासाहेब ठाकरे बाॅटनिकल उद्यानाच्या रस्त्यावरच्या खाऊगल्लीसाठी पाॅली युरीथान फोम पॅनल टपरी, स्टेनलेस स्टीलचे बोलार्ड, सलायडींग गेट इत्यादी कामांसाठी थेट ५६ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती "टेंडरनामा" तपासात समोर आली आहे.
यासंदर्भात प्रतिनिधीने उद्यान विभागातील एका कनिष्ठ अभियंत्याकडुन माहिती घेतली असता, त्यांनी तीन बाय तीन रूंदीच्या व अडीच मीटर उंचीच्या १३ टपऱ्या खरेदी केल्याची माहिती दिली. यात पार्किंग, स्टीलच्या साखळ्या व स्टेनलेस स्टीलचे बोलार्ड लावण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यासाठी चाळीस लाख रूपये खर्च झाल्याचा आकडा त्यांनी दिला. या कामासाठी ५ सप्टेंबर २०२३ रोजी टेंडर काढण्यात आले होते. १७.७७ टक्के कमी दराने टेंडर भरणारे छत्रपती संभाजीनगर शहरातील राॅयल इंटरप्रायझेसला या कामाचे टेंडर दिले होते. त्यांना ५ फेब्रुवारी २०२४ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. त्यांनी वाळुज एमआयडीसीतील आय. के. इंटरप्रायजेसला हे काम दिले आणि त्यांच्याकडून १३ टपऱ्यांसह टेंडरमधील इतर कामे करून घेण्याचा सपाटा लावला आहे.अद्याप मुख्य कंत्राटदाराकडून महापालिकेने या टपऱ्यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी झालेली नाही.
दुसरीकडे "टेंडरनामा" प्रतिनिधीने या संपूर्ण कामाचा लेखाजोखा तपासला असता शहर सौंदर्यीकरणाच्या कामांतर्गत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नगर रचना विभागाने महापालिका क्षेत्रात मुलभुत सोयीसुविधांसाठी ४० कोटी रूपये विशेष तरतुद म्हणून दिले होते.त्यानंतर मुख्य उद्यान अधिकारी डाॅ. विजय पाटील यांनी उद्यानाची पाहणी केली होती. त्याचा पाहणी अहवाल तत्कालीन कनिष्ठ अभियंता गोपीकिशन चांडक यांनी तयार केला होता. त्यात सिडको रेखांकनातील सिडको एन-८ भागात व परिसरातील नागरिक या उद्यानात प्रवेश फी देवून मनोरंजनासाठी येतात. सदरील उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ३० फुट रूंदीचा रस्ता असून रस्त्याच्या दोन्ही बाजुलगत १५ फुट रूंदीची जागा उपलब्ध आहे. या जागेत उद्यानात येणार्या नागरिक व मुलांसाठी खाऊगल्ली तयार करण्यासाठी महापालिका प्रशासकांनी मनोद्य व्यक्त केल्याचे अहवालात नमूद आहे. यासाठी ५० लाखाची तरतूद तयार केली गेली.
प्रशासकांच्या आदेशानंतर खाऊ गल्लीसाठी अत्याधुनिक पद्धतीच्या फायबरचा फुड प्लाझा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०२२-२३ च्या दरसूचीनुसार अंदाजपत्रक व नकाशा तयार करण्यात आला. त्यात स्टेनलेस स्टीलचे बोलार्ड, सलायडींग गेट इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला व खुल्या बाजारातील दर व व्यवसायातील एस.एस.ओ.प्रमाणित व्यावसायिकांकडून दरपत्रक मागविण्यात आले. याकामासाठी ४९ लाख ४९ हजारच्या अंदाजपत्रकाला प्रशासकांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली होती. यासंदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीने युरीथान फोम पॅनल फेब्रिकेटेड टपऱ्या तयार करून देणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यांनी सुरूवातीला एका टपरीची किंमत २ लाख २५ हजार रूपये सांगितली. यानंतर प्रतिनिधीने दुसऱ्या दिवशी संपर्क केला असता एक लाख ८० हजार रूपये सांगण्यात आले. तिसऱ्या दिवशी थेट कंपनीच्या संचालकांना संपर्क केला असता त्यांनी एका युनिटसाठी चक्क चार लाख ३० हजार रूपये किंमत सांगितली यात सुशोभिकरण, स्टेनलेस स्टीलचे बोलार्ड सलायडींग गेट व साखळ्यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. ज्या पाॅली युरीथान फोम पॅनल फेब्रिकेटेड मध्ये टपऱ्यांची बांधणी केली आहे, त्या फोमची किंमत टेंडरनामा प्रतिनिधीने मुंबई, पुणे, नाशिक, बंगलोर, ग्वाल्हेरच्या काही कंपन्यांशी संपर्क साधला असता सदर फोम हे १६०० ते २३०० रूपये पर स्क्वेअर मीटर मिळते. टपऱ्यांची साईज पाहता त्यावरून एका टपरीची किंमत ५० हजारापेक्षा कमी किंमतीत बांधली जाऊ शकते, असे ते म्हणाले.
एकुणच सलग आठ दिवस टेंडरनामाने या संपुर्ण खाऊगल्ली टेंडर संबंधित टपरी खरेदीचा लेखाजोगा बाहेर काढला असता मिळालेल्या माहितीचा विचार केला असता यात मोठा घोटाळा असल्याचा संशय बळावत आहे. खरेदीत मोठा भ्रष्टाचार असल्याचे समोर येत आहे.एक अधिकारी या कामासाठी ४० लाख रूपये खर्च केल्याचे सांगतो, दुसरा अधिकारी ४९ लाख ४९ हजार ६३९ रुपयाचे अंदाजपत्रक तयार करतो तर कंत्राटदार एका युनिटची चार लाख ३० हजार किंमत सांगून हा आकडा ५६ लाखापर्यंत नेतो. खुल्या बाजारातील लोक पाॅली युरीथान फोम पॅनल फेब्रिकेटेड मध्ये टपर्यांची बांधणी केल्यास १० बाय १० ची रूंदी व आठ फुट उंचीसाठी कमीत कमी ५० हजाराच्या आत बांधणीची हमी देतात. टेंडरनामाने केलेल्या तपासाप्रमाणे महानगरपालिकेने ५० हजारात सहज मिळणाऱ्या एका टपरी युनिटसाठी चक्क चार लाख ३० हजार रुपयांमध्ये खरेदी केल्याचे समोर आले आहे. यात साडेसहा लाखात होणारे काम चक्क ५६ लाखांवर नेण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत इतर विभागात देखील हा टपरी खरेदीचा चर्चेचा विषय ठरला आहे. या संपूर्ण खरेदीची चौकशी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केल्यास नक्कीच खेरदीत घोटाळा झाल्याचे समोर आल्याशिवाय राहणार नाही.