
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : राज्य सरकार, महापालिका निधी व स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरात गेल्या काही वर्षांत हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे झालेली आहेत. त्यामुळे महापालिकेने आगामी काळात शहर परिसरातील विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यात १६ रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असून, सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे.शहराची कधीकाळी खड्ड्यांचे शहर अशी ओळख तयार झाली होती. त्यामुळे महापालिकेची राज्यभर बदनामी झाली. त्यामुळे गेल्या आठ-दहा वर्षांत महापालिकेने रस्त्यांची कामे करण्याकडे विशेष लक्ष दिले. राज्य शासनाने देखील महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यासोबत महापालिका व स्मार्ट सिटीच्या ३१७ कोटींच्या निधीतून शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे विणल्या गेले आहे.
त्यासोबत आमदार-खासदार निधीतून गल्लीबोळातील रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिकेने आता विकास आराखड्यातील रस्त्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. जुन्या विकास आराखड्यातील १६ रस्ते अद्याप तयार झालेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यांसाठी आवश्यक त्याठिकाणी भूसंपादन करण्यासोबत कामे करण्यासाठी १५० कोटी रुपयांचा अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पाठविण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
शहर परिसराचा होणार विकास
शहर परिसरात नागरी वसाहती वाढत आहेत, मात्र अनेक भागात मुख्य रस्ते नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे झाल्यास कनेक्टिव्हीटी वाढणार आहे.