Sambhajinagar : उड्डाणपुलावरील कठड्याला दोन महिन्यांपासून दुरूस्तीची प्रतिक्षा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुलाच्या कठड्याला गॅस टॅंकरने धडक दिलेल्या तुटलेल्या कठड्याला दुरूस्तीसाठी दोन महिन्यांपासून प्रतिक्षा आहे. तुटलेल्या कठड्यामुळे धोका अद्याप कायम आहे.पुलाच्या धावपट्टीवर आणि पुलाखालील जोड रस्त्यावर कठड्याचा मलबा पडल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. त्या ठिकाणी वेळोवेळी लहान-मोठे अपघात होत आहेत.

Sambhajinagar
Sambhajinagar : निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता दुरूस्तीसाठी पुन्हा खोदला

दोन महिन्यांपूर्वी एचपीसीएलच्या एका गॅस टॅंकरने धडक दिल्याने कठडा तुटला होता. नशीब बलवत्तर टॅंकर पुलाखाली कोसळले नाही. अन्यथा शहरात मोठी जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेनंतर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी.श्रीकांत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह महापालिका, शहर वाहतूक शाखा, महावितरण, आरटीओ अधिकाऱ्यांची शहरातील सदोष मुख्य रस्त्यांची तपासणी व त्यावर उपाय योजना करण्यासाठी समिती स्थापन केली होती. मात्र अद्याप समितीने अहवाल सादर केला नाही. ना रस्त्यांची पाहणी करून उपाय योजना आखल्या. त्यात ज्याठिकाणी इतकी मोठी घटना घडली त्या तुटलेल्या कठड्याची दुरुस्ती अद्याप करण्यात आली नाही.त्यामुळे येथील पुलावरील नाईक महाविद्यालयाच्या बाजूच्या तुटलेल्या संरक्षण कठड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.दिवसेंदिवस पुलावर आणि जोड रस्त्यांवर वाहतुकीची संख्या वाढत आहे. तुटलेल्या कठड्याची अवस्था वाईट झाली असून,  संरक्षण कठड्याचा मलबा रस्त्यावर पसरला असून  विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ट्रकने  कठडे तोडला त्या कठड्याचे स्टील उघडे पडल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. मात्र दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती न करता तुटलेल्या संरक्षण कठड्यासमोर रिफ्टक्लेक्टर लाऊन पांढरे पट्टे मारून अर्धवट जबाबदारी पार पाडली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तुटलेल्या कठड्याची संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरूस्तीसाठी कानाडोळा केला असून, तुटलेले कठडे तत्काळ दुरुस्त करून नवीन बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे.

Sambhajinagar
Mumbai : बॉडी बॅग (शव पिशव्या) खरेदी प्रकरणात न्यायालयाकडून 'एसीबी' फैलावर

छत्रपती संभाजीनगर शहरातून जालन्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत झाले आहे. "टेंडरनामा"ने या उड्डाणपूलाची तांत्रिक माहिती तपासली असता गाळ्यांची एकुण लांबी ६८० मीटर असून जोड रस्ते व रॅम्पवाॅल ३२५ मीटर आहेत. चारपदरी धावपट्टी असून १७.२० मीटर रूंद आहे. पुलाची एकुण लांबी १११३ मीटर असून मुंबईच्या रंजन मिश्रा यांच्या मे. जेएमसी प्रोजेक्ट इंडिया प्रा.लि. यांनी पुलाचे बांधकाम केले आहे. या पुलाच्या बांधकामावर देखरेखीसाठी सुधीर आपटे यांच्या मे.श्रीखंडे कंन्सलटंटस कंपनीची प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली होती. या पुलाच्या बांधकामासाठी ५६ कोटी २५ लाख इतका खर्च झालेला आहे.‌ या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराला १३ फेब्रुवारी २०१४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. २० जुन २०१६ रोजी प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर आठ वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराकडे होती.चार महिन्यांपूर्वी संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या धावपट्टीचे डांबरीकरण करून पुलाची पुढील देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

पूलावरील धावपट्टीवर अनेकदा डांबराचे थरावर थर चढवल्याने संरक्षित कठड्यांची उंची कमी झाल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.‌ त्यात दोन महिन्यांपूर्वी एका बाजूचा कठडा तुटलेल्या अवस्थेत तसाच आहे. तिथे पुन्हा अपघात होऊन ट्रक पुलाखाली कोसळण्याची बांधकाम विभाग वाट पाहत आहे. इतकी मोठी घटना घडल्यानंतर देखील कठड्याची दुरुस्ती का केली जात नाही. यावर प्रवाशांमधुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, याच ठिकाणी लहान-मोठे अपघात होतच आहे. छत्रपती संभाजीनगर शहराहून जालनाकडे जाताना-येताना उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसह ये-जा होते. हा राष्ट्रीय महामार्ग मध्ये येत असून, यावरून दिवसभरातून सव्वा लाख वाहने जातात. त्यामुळे रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. संभाव्य मोठे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने पुलावरील संरक्षण कठड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या बांधकाम विभागाला  दुरुस्तीचा मुहूर्त सापडला नसून याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. या पुलावर कधीही मोठा अपघात होऊ शकतो. कारण वाहन कोणत्याही क्षणी खाली जाऊ शकते व मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकरता येत नाही. मात्र प्रशासनाने कोणतेही ठोस काम न केल्याने संभाव्य मोठा अपघात टाळण्यासाठी तत्काळ कठड्यांची दुरुस्ती करावी, नवीन भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी  शहरवासीयांसह वाहनचालकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com