Sambhajinagar : गडकरीसाहेब, हाच का तुमचा डबकेमुक्त जालनारोड?

कोट्यावधींचा चुराडा; तरीही डबके का?
Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराची लाईफलाइन असलेल्या जालना रस्त्याचा श्वास कित्येक वर्षांपासून कोंडला आहे. आता त्यावरील कोंडी फोडण्यासाठी अखंड उड्डाणपुल आणि नियोमेट्रोच्या नुसत्याच आढावा बैठका सुरू आहेत. मात्र, हे काम होईल तेव्हा होईल निदान मृत्युचा राष्ट्रीय महामार्ग समजल्या जाणाऱ्या या रस्त्यालगत साचणाऱ्या डबक्यांपासून आमची मुक्ती करा, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात करावी लागते. अवकाळी पावसातच रस्ता डाबक्यात हरवल्याने पावसाळ्यात काय स्थिती निर्माण होईल, अशी जोरदार चर्चा आहे. 

Sambhajinagar
Devendra Fadnavis : उजनीसह 5 धरणातील गाळ काढण्यासाठी लवकरच टेंडर

जालनारोडवर असलेले नाले बुजले गेल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यासाठी विशेष व्यवस्था केली गेली. त्यामुळे आता जालनारोडवर डबके इतिहास जमा होतील, पाणी कुठेही साचणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांना दिली होती. मात्र, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणचे तत्कालीन प्रकल्प संचालक अजय गाडेकर आणि त्यांच्या टीमची ठेकेदाराशी असलेली टक्केवारी प्रत्येक अवकाळी आणि मोसमी पावसात टेंडरनामा उघड करत आहे. गडकरींनी लोकार्पण सोहळ्यात डबके इतिहास मुक्त होतील, अशी ग्वाही देताच भाजप समर्थकांनी टाळ्यांचा गडगडाट केला होता. मात्र, कोट्यावधी रूपये खर्च करून  रस्त्यालगत बांधलेल्या आरसीसी गटाराला डबक्यांनी ठिकठिकाणी विळखा घातला असून, डबक्यांनी इतिहास निर्माण केल्याचे टेंडरनामा सलग उघड करत आहे.

Sambhajinagar
Devendra Fadnavis : वॉशरीजमध्ये नाकारलेल्या कोळसा विक्रीची तपासणी

कारवाई नाहीच..

आरसीसी गटार बांधूनही रस्त्यावर डबके का साचते. यावर टेंडरनामा प्रतिनिधीने सातत्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे तत्कालीन प्रकल्प संचालक अरविंद काळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, आमच्या पाहणीत कुठेही डबके साचले नसल्याचे म्हणत त्यांनी ठेकेदाराची पाठराखण केली होती. यावर प्रतिनिधीने सचित्र सवाल करताच काळे यांची बोबडी वळाली होती. यानंतर मात्र काळेंनी तातडीने पाईपांची साफसफाई करायचे आदेश देतो, यापुढे पाणी साचणार नाही याची काळजी घेऊ, असे म्हणत वेळ मारून नेली होती.

Sambhajinagar
Sambhajinagar: कॉंक्रिटच्या रस्त्यांना का येतेय नद्यांचे स्वरूप?

आता पहिले पाढे पच्चावन्न

त्यानंतर आलेल्या प्रकल्प संचालक रविंद्र इंगोले यांना प्रतिनिधीने सवाल केला असता मी चार महिन्यात अनेकदा रस्त्याची पाहणी केली. एपीआय कॉर्नरजवळ महापालिकेने पॅव्हरब्लाॅकच उखडून ठेवले आहेत. जालनारोडवर जलवाहिनी आणि G-20 साठी अनेक ठिकाणी खोदकाम झाले आहे. तरीही मी पुन्हा पाहणी करतो. संबंधित यंत्रणेला गटारीचे होल स्वच्छ करायला लावतो व पाण्याचा निचरा करायला लावतो, असे ते म्हणाले.

चौकशी करणार

मात्र, या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना विचारणा केली असता या संपुर्ण विकासकामाची माहिती मागविण्यासाठी आम्ही संबंधित विभागाला पत्र व्यवहार करणार आहोत. याकामाची तांत्रिक तपासणी करून संबंधित ठेकेदाराच्या कामाची तपासणी करणार असल्याचे ते म्हणाले.

Sambhajinagar
Mumbai: पूर्व, पश्चिम महामार्गाखाली नालेसफाईसाठी 5 ठेकेदार नियुक्त

ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर पांघरूण

जालना रोडच्या मजबुतीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ७४ कोटींची मंजुरी दिली. या कामांसाठी पीडब्लुडीकडुन रस्त्याचे नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाकडे हस्तांतर करण्यात आले होते. प्रकल्पाच्या बांधकामासाठी हैद्राबाद येथील सृष्टी काॅन्टेच प्रा. लि. या कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. मंजुर झालेल्या ७४ कोटी ८८ लाखातून २.२१ कमी दराने त्याने टेंडर मान्य केल्याने ७३ कोटी २० लाख ४९ हजारात त्याला कामाचा ठेका देण्यात आला होता. त्याची रितसर वर्कऑर्डर १३ नोव्हेंबर २०१९ रोजी देण्यात आली होती. मात्र मधल्या काळात करोना परिस्थितीमुळे मार्चमध्ये सुरू होणारे काम टप्प्याटप्प्याने बंद-सुरू होत होते.  लॉकडाऊननंतर मात्र हे काम त्याने पूर्ण केले होते. मात्र ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर पांघरून घालण्यात येत आहे.

Sambhajinagar
Nagpur : शस्त्राच्या धाकावर केबल चोरी; सरकारी कार्यालयात सेवा ठप्प

काय होते अंदाजपत्रकात

नगरनाका ते कॅम्ब्रिज एकूण १४.५ किलोमीटरपैकी कॅम्ब्रिज नाका ते चिकलठाणा विमानतळ तसेच महावीर चौक ते नगरनाका रस्त्याचे मजबुतीकरण आवश्यक त्या ठिकाणी 'ड्रेन' (पाण्याचा निचरा करून देण्याची सोय) तसेच मुकुंदवाडी, सेंट फ्रान्सिस स्कुल व जिल्हा न्यायालयासमोर पादचाऱ्यांसाठी लोखंडी ओव्हर ब्रीज, रस्त्याच्या शोल्डरमध्ये फुटपाथ असा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला होता.

गटार असून अडचन नसून खोळंबा

डबके मुक्त राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी जालना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहून जाण्यासाठी खास आरसीसी गटार बांधण्यात आली. मात्र, तरीही प्रत्येक पावसाळ्यात मोठी तारांबळ उडत आहे. टेंडरनामा प्रतिनिधीने सोमवारी सकाळी सात ते अकरा दरम्यान दोन्ही बाजुने जवळपास ३० किलोमीटर रस्त्याची पाहणी केली, दरम्यान अजंता ऍम्बेसेडर, रामा हॉटेल या पंचतारांकीत हाॅटेलसह उच्च न्यायालयपरिसर, सेव्हनहिल, आकाशवाणी, मोंढानाका, अमरप्रीत, क्रांतीचौक, जिल्हा न्यायालय, महावीर चौक ते नगरनाका, मुकुंदवाडी ते चिकलठाणा विमानतळ ते कॅम्ब्रिज चौक परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहे. नव्यानेच हे काम झाल्याने रस्त्याच्या कामाच्या टेंडरमधील अटीशर्तीनुसार देखभाल दुरुस्तीचा कालावधी बाकी असताना या गटारीच्या स्वच्छतेकडे ठेकेदाराचा कानाडोळा आहे.

Sambhajinagar
Nashik: फाळके स्मारकातील सेवा दुपटीने महागणार; काय आहे कारण?

रस्त्यावर खड्डे अन् विद्रुपीकरण

कोट्यावधी रूपये खर्च करूनही रस्त्यालगत पूर्वीप्रमाणे पाणी साचल्याने रस्त्याच्या कामावर खड्डे पडत आहेत. यातून रस्त्याचे सौंदर्य तर विद्रुप होतच आहे. मात्र साचलेले डबके रस्त्याचे आयुष्य खराब करत आहे. याचे यंत्रणेला सोयरसुतक का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

वाहुतकीस अडथळा

दरम्यान, या संपुर्ण लांबीत प्रत्येक चौकात तळे साचल्याने जालना रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा येत आहे. परिणामी वाहतुक कोंडीत भर पडत आहे. जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी रस्ता निमुळता झाल्याने अपघाताचे संकट आ वासून उभे आहे. सध्या अवकाळी पावसाळा असल्याने डबके धोक्याचेच आहेत. परिमाणी रस्त्यालगत कोट्यावधीची 'ड्रेन' असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com