Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगर शहरासाठी मंत्री शिरसाटांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

शहरात उभारणार १०० हाय-टेक ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarTendernama
Published on

मुंबई (Mumbai): छत्रपती संभाजीनगर शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शहरातील सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात लवकरच १०० नवीन ‘पे अ‍ॅण्ड यूज’ सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ही घोषणा केली.

Chhatrapati Sambhajinagar
Chandrashekhar Bawankule: 'त्या' सोसायट्यांच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत शहरात १०० नवीन ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले.

यावेळी शिरसाट म्हणाले की, "छत्रपती संभाजीनगर हे एक ऐतिहासिक आणि पर्यटन शहर असून, येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी, विशेषतः बाजारपेठा, बसस्थानके, दाट लोकवस्तीच्या वसाहती, पर्यटनस्थळे आणि प्रमुख चौकांमध्ये अद्यापही पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. यामुळे नागरिक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होते. ही गरज ओळखून वाढत्या लोकसंख्येला अनुरूप अशा आधुनिक स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झाले आहे."

Chhatrapati Sambhajinagar
Nashik: कुंभमेळा प्राधिकरण पदभरतीला आता येणार वेग

राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळाच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या १०० शौचालयांच्या दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ही पूर्णपणे स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांकडे दिली जाणार आहे. यामुळे सफाई कामगारांना केवळ कामच मिळणार नाही, तर त्यांना सन्मानाने स्वयंरोजगार करण्याची संधी प्राप्त होईल, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

या योजनेअंतर्गत, १०० लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे आवश्यक जागा उपलब्ध करून दिली जाईल. तर, प्रकल्पासाठी लागणारा निधी 'राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळा'च्या माध्यमातून दिला जाईल. हा संपूर्ण प्रकल्प महानगरपालिका आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Good News! अवघ्या 3 वर्षांत उभा राहणार पुणे ते शिरूर डबल डेकर मार्ग

उभारण्यात येणारी ही नवीन शौचालये आधुनिक 'प्री-फॅब्रिकेटेड' किंवा 'मॉड्यूलर' तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत. यामध्ये अनेक सुविधांचा समावेश असेल. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष, दिव्यांग व्यक्तींसाठी वापरण्यास सोपी अशी विशेष रचना, २४ तास पाण्याची उपलब्धता, विद्युत व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक, नियमित साफसफाई होणार आहे.

या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदार, सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com