सातारा-देवळाईकरांसाठी गुड न्यूज; महावितरण 625 कोटींतून पायाभूत सुविधा उभारणार

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : ऐन परीक्षा काळात सातारा-देवळाईत २३ ते २४ फेब्रुवारी दरम्यान तब्बल २४ तास ‘बत्ती गुल’ झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला होता. दरम्यान सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांनी सातारा उपकेंद्रात वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात बत्ती गुल होण्यामागची कारणे काय यावर महावितरण कंपनी काही उपाययोजना करणार का, असा थेट सवाल महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपुत यांना करताच त्यांनी सातारा-देवळाई भागासाठी आरपीडीएस (Revamped public distribution system) अर्थात सुधारित सार्वजनिक वितरण प्रणाली योजनेंतर्गत ६२५ कोटीतून विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार असल्याची खास माहिती दिली, त्याचा हा खास रिपोर्ट.

सध्या परीक्षांचा हंगाम सुरु असून दहावी बारावीच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा काळातच महावितरणमुळे सातारा-देवळाई व बीडबायपासकरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सातारा-देवळाई व बीड बायपास परिसरात उप केंद्रातील बिघाडामुळे २३ ते २४ फेब्रुवारी दरम्यान २४ तास "बत्ती गुल" झाल्याने नागरिक हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर विज कंपनीने या भागात दीर्घकाळ वीजपुरवठा सुरळीत राहील, अशा प्रकारची कामे तत्काळ करण्यासाठी काही उपाय योजना केल्या आहेत का, असा थेट सवाल "टेंडरनामा" प्रतिनिधीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपुत यांना करताच त्यांनी यापुढे विजेचा  लपंडाव व त्यामुळे येणार्या अनेक अडचणी लक्षात घेऊन यापुढे वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आरपीडीएस योजनेंतर्गत १५० कोटीतून पायाभूत सुविधा उभारणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपुत यांनी खास माहिती "टेंडरनामा" प्रतिनिधीला सांगितली. या योजनेत अनेक पाण्याभुत सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याने निश्चितच सातारा - देवळाई, बीड बायपाससह नक्षत्रवाडी, कांचनवाडी, विटखेडा व पैठणरोडवासीयांची वणवण थांबेल. वीज सेवा सुरळीत होईल असा दावा त्यांनी केला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : राष्ट्रीय महामार्ग की ‘कचरा’मार्ग? 'या' ठिकाणी साठणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा

सातारा-देवळाई व बीड बायपास परिसरात सलग दोन दिवस २४ तास वीजपुरवठा गुल होताच या भागातील वीज ग्राहकांनी पावसाळ्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे धोकादायक असलेली कामेसुद्धा सुरू करण्यात आलेली नसून वीज गुल होण्याची अनेक कारणे पुढे करत कंपनी अधिकाऱ्यांसमोर आरोप केले.अधिकाऱ्यांना वीज गुल होण्याची कारणे विचारली असता नेमकं उत्तर देणे त्यांना शक्य होत नाही. हेल्पलाईन कायम बंद किंवा व्यस्त असते. दोन दिवसात साधारण २४ तास वीजपुरवठा बंद करण्यात आला. परिक्षाचा हंगाम त्यात या भागात आधीच कच्चे रस्ते, तेही एकाच वेळी भुमिगत गटार योजना आणि जलवाहिनीसाठी खोदण्यात आल्याने जिकडे तिकडे जीवघेणे खड्डे, अशा धोकादायक परिस्थितीत समस्यांचा मोठा डोंगर असताना महावितरण विभागाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने सातारा - देवळाई व बीड बायपासकरांची पुरती दमछाक होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता तेथील अधिकार्यांनी काही पक्षी असु शकतात. घुबड, खार, सरड्या जंपवर बसले तर फीडर जाम होते, ते लवकर स्टॅन्ड होत नाही. जंपवर अडकलेला पक्षी काढल्याशिवाय फाॅल्ट निघत नाही.

सातारा-देवळाईसह बीड बायपास भागात सातारा उप केंद्रांतर्गत २८ हजार वीज ग्राहक आहेत. याभागात विविध भागात वीज पुरवठा वितरण करण्यासाठी ११७ रोहित्रं आहेत. फीडरची संख्या नगण्य आहे.याभागाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने फीडर व रोहीत्रांची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात सब स्टेशन वाढविण्याचा मुद्दा देखील वीज ग्राहकांनी उपस्थित केला. शहानुरवाडीतील काही भागासह सिल्कमिल्क काॅलनी, रेणुकामाता मंदिर कमान ते सातारा गाव, एस आर पी कॅम्प, श्रेयस इंजिनिअरींग काॅलेज ते एमआयटी परिसर, बीड बायपास, निशांतपार्क असा विज ग्राहकांचा विस्तार वाढत असल्याने पुरेसा कर्मचारी वर्ग देखील नाही. सद्य:स्थितीत १ सहाय्यक अभियंता, ३ प्रधान तंत्रज्ञ, ६ वरिष्ठ तंत्रज्ञ, ५ कनिष्ठ तंत्रज्ञ, १ विद्युत सहाय्यक, ३ बाह्यस्रोत कर्मचारी असे एकुण २२ कर्मचाऱ्यांवर २८ हजार वीज ग्राहकांची सेवा करण्याची जबाबदारी आहे. इतक्या मोठ्या विज ग्राहकांसाठी हा कर्मचारी वर्ग कमी असल्याने अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात.

Sambhajinagar
Mumbai : बायोगॅसपासून उजळणार ग्रँट रोड येथील एलटी मार्केट परिसर

या भागात विद्युत खांब अत्यंत कमी आहेत. दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खांब असल्याने लांब अंतरापर्यंत ओहरहेड सर्व्हिस केबल ओढलेल्या असतात.‌त्या वारावादळाने, मुसळधार पावसाने हलतात. परिणामी फिडर व रोहीत्रांवर तान वाढताच वीज गुल होते. सातारा-देवळाई व बीड बायपास भागात एन - ए ४४ रेखांकनधारकांनी स्वतंत्र विद्युत संचांची मांडणी करून वीज पुरवठ्याची सोय करणे अपेक्षित असताना महावितरणच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जुण्याच फिडर व रोहीत्रांवरून वीज पुरवठा दिला जातो. याभागातील अखंडीत वीजपुरवठा होण्यासाठी रस्ते व नाल्यातील खांब स्थलांतरित करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाऊल उचलणे गरजेचे आहे. वीज तारांना स्पर्श करणारी वृक्षांच्या फांद्या तोडल्या गेल्या पाहीजेत.

वारंवार वीज खंडित करण्यात येत असल्याने वेळेवर साऱ्यांचीच फजिती होत आहे.त्यातच उन्हाचा पारा चढला असल्याने उकाड्यात  वीजपुरवठा बंद करण्यात येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान "टेंडरनामा" प्रतिनिधीने येथील विज गुल होण्याची कारणे शोधली असता सातारा उप केंद्रातील सरकीट ब्रेकरचा एक फेज चिपकल्याने नट गळुन पडला. त्यामुळे १६ ते १७ फाॅल्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लायटींग अरेस्टर जळाल्याने विद्युत तारांमधील वीज प्रवाह डॅमेज झाला होता. विज वितरण करणारा करंट ट्रांन्सफार्मा जळाल्याने ४ पोस्ट इन्सुलेटर जळाले. यामुळे २४ तास वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण अधिकार्यांनी पुढे केले.

Sambhajinagar
Mumbai : बेस्टच्या 2400 ई-बसचे टेंडर 'ऑलेक्ट्रा'च्या खिशात; 4 हजार कोटी...

असा होणार ६२५ कोटीतून आरपीडीएस योजनेंतर्गत कायापालट

विज कंपनीने दीर्घकाळ वीजपुरवठा सुरळीत राहील,यासाठी काही उपाययोजना करणार काय, असा सवाल करताच महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपुत यांनी अंत्यंत महत्वाची माहिती दिली. त्यात नक्षत्रवाडी, सातारा यासाठी सहा नवीन उपकेंद्र प्रस्तावित केले होते. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी जवळपास ६२५ कोटी खर्च होणार आहेत. यातुंन सातारा देवळाईसाठी १५० कोटीचा बजेट मंजुर करण्यात आला आहे. यात देवळाई चौक, एसआरपी कॅम्प, कासलीवाल मार्व्हल, नक्षत्रवाडी,जलकुंभ, व ऑक्टोझोन तसेच शेतकी शाळा अशा एकुण सहा ठिकाणी नवीन उपकेंद्र होणार आहेत. यामुळे सद्य:स्थितीत जे २५० ॲम्पिअरचे लोडेल फिडर आहेत ते सर्व १०० ते १५० ॲम्पिअरचे छोटे छोटे फिडर होतील. परिणामी ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा होईल.‌ जर एखाद्या उप केंद्रात बिघाड झाल्यास दुसर्या उप केंद्रातुंन तातडीने वीज पुरवठा करता येईल. अशी रिंगरूट सिस्टिम महावितरण कंपनी याभागासाठी बनवत असल्याचा दावा राजपुत यांनी केला आहे.‌

सातारा-देवळाई व बीड बायपाससाठी नवीन २५० विद्युत खांब व जवळपास नव्याने २५० रोहीत्रे व १६ किलोमीटरच्या एल.टी लाईन तसेच २२ किलोमीटरच्या अकरा केव्ही व ३६ किलोमीटरच्या ३३ के.व्ही लाईन नव्याने टाकण्यात येणार आहेत. यात जुन्या वीज तारा व जुने विद्युत खांब बदलने नवीन खांब टाकणे व ५ एम.व्ही.एम च्या रोहित्रांचे १९ एम.व्ही.एम.मध्ये रूपांतर केले जाणार असल्याने ही सर्व नवीन रोहित्रं सातारा उप केंद्रात बसविले जाणार आहेत. सद्य:स्थितीत सातारा-देवळाई व इतर भागात सातारा आणि उच्च दाब उपकेंद्रातुन विद्युत पुरवठा केला जातो. मात्र वीज ग्राहकांची वाढती संख्या व त्यानुसार वीज पुरवठ्याची वाढती मागणी लक्षात घेऊन महावितरण कंपनीने महाट्रान्समिशनकडे गोलवाडी येथील शेतकी शाळा व गांधेली येथील राममंदिर परिसराच्या जागेत नवीन अतिउच्च दाब केंद्रासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यात ६५ कोटींचे दोन सबस्टेशन मंजुर झालेले आहेत. प्रकल्प सल्लागारामार्फत त्याची तपासणी सुरू असून लवकरच याकामांचे टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती राजपुत यांनी दिली.याशिवाय सातारा - देवळाई व बीड बायपाससाठी एक नवीन उप विभाग प्रस्तावित केलेला आहे. मुख्यालयाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे ते म्हणाले.

महावितरणच्या प्रयत्नांना महापालिकेची आडकाठी

महावितरण कंपनीला ओव्हरहेड वीजतारा भुमिगत करण्यासाठी खोदकामाची आवश्यकता असते.‌काही वर्षांपूर्वी आयपीडीएस योजनेंतर्गत संपुर्ण शहरात हे काम होणार होते. आता हेच काम आरपीडीएस योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र महापालिका पर रनिंग मीटर १४ हजार रूपये खोदकाम शुल्क आकारत असल्याने योजना परत जाते. शहरातील सर्व ओव्हरहेड वीजतारा व केबल भुमिगत झाले तर वृक्षांची कत्तल थांबेल, पर्यावरणाची हानी होणार नाही, गणेशोत्सव अथवा इतर धार्मिक उत्सवाच्या मिरवणुकीत वीज तारांचा अडथळा येणार नाही. याशिवाय वीज तारांवर बसणार्या मुक्या प्राणी व पशुंचा बळी जाणार नाही.मात्र महावितरणचे अवाजवी खोदकाम शुल्कामुळे या महत्त्वाच्या योजना परत जातात. परिणामी शहरात ओव्हरहेड वीज तारा व केबलमुळे शहराचे विद्रुपीकरण कायम असल्याची शोकांतिका महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com