
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचे आदेश सरकारने दिले. त्यानुसार महापालिकेने ८६ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला.
त्यात कांचनवाडी तसेच दिल्ली गेट येथील महापालिकेच्या निवासस्थानाचा परिसर, सिडको एन-७ येथील जुने झोन कार्यालय व चिकलठाणा आठवडे बाजार परिसरात वसतिगृह बांधण्याचा समावेश आहे. प्रत्येक वसतिगृहात शंभर महिलांच्या निवासाची व्यवस्था राहणार आहे.शहरातील नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने १२ सप्टेबर २०२४ ला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. कांचनवाडी येथील महापालिकेच्या ‘एसटीपी’चा (मल जल प्रक्रिया प्रकल्प), दिल्ली गेट येथील महापालिका कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा परिसर, सिडको एन ७ येथील जुने झोन कार्यालय, चिकलठाणा आठवडे बाजार परिसर या चार ठिकाणच्या जागा निश्चित करण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी शंभर महिलांसाठी व्यवस्था राहणार आहे.
यश इनोव्हेशन सोल्युशन या पीएमसीमार्फत प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यात प्रत्येकी २१ कोटी ५६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. चार वसतिगृहांच्या बांधकामासाठी ८६ कोटी २४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला.
का आहे गरज?
शहरालगत शेंद्रा, तसेच वाळूज, बिडकीन भागात झपाट्याने औद्योगिकीकरण वाढत आहे. नवनवीन कंपन्या येणाऱ्या काळात सुरू होणार आहेत. औद्योगिक क्षेत्रात तसेच उद्योगांमध्ये व शहरातील विविध आस्थापनांमध्ये नोकरी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. त्यांना सामाजिकदृष्ट्या सुरक्षित व आर्थिकदृष्ट्या परवडणारे अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले वसतिगृह गरजेचे आहे.