18 वर्षांत पालिकेला जमले नाही; MIDCने 4 वर्षांत कसे करून दाखविले?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेला जे १८ वर्षात जमले नाही, ते एमआयडीसीने तीन वर्षांत करून दाखविले, याचीच गावभर चर्चा सुरू आहे.

Sambhajinagar
Ratnagiri : 'जलजीवन मिशन'चे होणार थर्ड पार्टी ऑडिट

जालना एमआयडीसीमध्ये मोठा खर्च करून पाणी पोहचविणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) पाठोपाठ चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या पाणी प्रश्नांकडे लक्ष दिल्याने उद्योजक, नागरी वसाहती, विमानतळ आणि खाजगी व सरकारी रुग्णालयात मुबलक पाणी पुरवठा केला जाणार असल्याने येथील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसते आहे.

महापालिकेला १८ वर्षांत जमले नाही, ते एमआयडीसीने तीन वर्षांत करून दाखविले आहे. यात ३५० कोटीची जायकवाडी ते जालना एमआयडीसी ही ५५ कि.मी. पहिली पाणी पुरवठा योजना एमआयडीसीने गत वर्षी पूर्ण केली. पाठोपाठ वाळूज जलशुध्दीकरण केंद्र ते चिकलठाणा जलकुंभ ही २० कि.मी.ची  ३० कोटीच्या दुसऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील रुद्राणी इनफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने मुदतीत योजना पूर्ण करत आहे.

पाइपलाइन थेट जालन्यापर्यंत

छत्रपती संभाजीनगर  महापालिकेला गेल्या १८ वर्षांत जे जमले नाही ते एमआयडीसीने ३ वर्षांत करून दाखवले. जायकवाडी धरणातून थेट जालना एमआयडीसीपर्यंत ५५ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकून पाणी पोहोचवले. ऑरिक सिटीलाही पाणी दिले. विशेष म्हणजे अवघ्या ३५० कोटी रुपयांत ही योजना पूर्ण झाली असून त्याचे काम छत्रपती संभाजीनगर येथील विवेक देशपांडे यांच्या रूद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर या  कंपनीने केले आहे. त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि कामाची गती पाहुनच त्यांना एमआयडीसीने वाळूज जलशुध्दीकरण केंद्र ते चिकलठाणा जलकुंभ जलवाहिनी टाकण्याचे काम दिले. तेही त्यांनी दिलेल्या मुदतीत दर्जेदारपणे अंतिम टप्प्यात आणले.

महापालिकेचा ढिम्म कारभार

२००५ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरासाठी नवी जलवाहिनी टाकण्याची पहिली घोषणा झाली. ती अजूनही पूर्ण झाली नाही. १६८० कोटींची नवी योजना ३००० कोटींवर येऊन पोहोचली कंत्राटदाराच्या कासवगती कारभाराने अद्याप  या योजनेतील वीस टक्के देखील कामे पूर्ण झाली नाहीत. दुसरीकडे एमआयडीसीने ३ वर्षांत जायकवाडी ते जालन्यापर्यंत ९०० मिमीची पाइपलाइन टाकली. २०१७ मध्ये सुरू झालेले काम २०२० मध्ये अर्थात दिलेल्या मुदतीत पूर्ण केले. खोडेगाव येथे भव्य जलशुद्धकीरण केंद्र अवघ्या दोन वर्षांत उभा केला.

विशेष म्हणजे योजनेतील महत्वाचा टप्पा म्हणजे धरणात जॅकवेलचे काम काही महिन्यांत पूर्ण केले. तेथून आता दररोज २४ एमएलडी पाणी उपसा सुरू झाला आहे. ३१० कोटीत मुख्य पाइपलाइन व जलशुद्धीकरण केंद्र तसेच ४० कोटीत जॅकवेल उभारले गेले आहे.

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांत असमन्वय 

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अधिकारी आणि येथील लोकप्रतिनिधी यांचा असन्वय आणि जनतेचा फायदा व्हावा ही इच्छाशक्तीच नसल्याने सतरा वर्षापूर्वी किर्लोस्कर कंपनीने २६० कोटीत नक्षत्रवाडी जलशुद्धीकेंद्रापर्यंत छत्रपती संभाजीनगरवासीयांना पुरेल एवढे पाणी आणण्याच्या कंपनीचा प्रस्ताव "तोड" पाण्याच्या प्रक्रियेतच गुंडाळला गेला होता.

Sambhajinagar
Pune: 'या' विभागात 4,751 जागांची मोठी भरती; 25 मे पर्यंत करा...

नियोजनशुन्य कारभाऱ्यांनी याचा आग्रह धरावा

● आधी उन्हाळ्यात धरणातील जॅकवेल आणि पंपिंग हाऊस सोबत पायाभुत सुविधांचे काम तातडीने पूर्ण करावे.
● जायकवाडी ते नक्षत्रवाडी नवीन जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करणे अपेक्षित आहे.
● नक्षत्रवाडी जलशुध्दीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे.
● त्यानंतर योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील जलकुंभाचे काम तातडीने पूर्ण करून मुख्य व अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे पसरविण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. 
● आधी जॅकवेलसाठी पर्यावरण विभागाची परवानगी काढण्यास अनेक वर्षे लागली. मात्र परवानगी मिळाल्यानंतर देखील कंत्राटदार मे. जीव्हीपीआर कंपनी कामाची गती का वाढवत नाही, याचा शोध घेतला पाहीजे.

याचा बोध महापालिकेने घ्यावा

एमआयडीसीचे तत्कालीन मुख्य अभियंता शिवहरी यांच्या काळात जालना पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी संबंधित सर्व विभागांच्या परवानग्या, टेंडर, जागा निश्चिती, अधिग्रहणाचे नियोजन केले. मुख्य म्हणजे कामाची गती कमी करणारे सर्व अडथळे दूर केले. परिणामी शिस्तबध्द काम केल्याने तत्कालीन उद्योगमंत्री, सचिव, वरिष्ठ अधिकारी, ठेकेदाराने तीन वर्षात योजना पूर्ण केली. विशेष म्हणजे एमआयडीसीने पैशाअभावी योजना थांबणार नाही याची देखील काळजी घेतली.

त्यामुळे सेवानिवृत्त मुख्य अभियंता पी. जे. रंगारी, तत्कालीन मुख्य अभियंता राजेंद्र केंद्रे, कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी, सेवा निवृत उप अभियंता दिलीप परळीकर, उपअभियंता संध्या लुलेकर, सेवानिवृत्त उपअभियंता आर. एस. कुलकर्णी, सहायक अभियंता
अरुण पवार, प्रशांत सरग आणि कंत्राटदार, रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लि. तसेच, प्रकल्प व्यवस्थापक गणेश खोतवड व जॅकवेलसाठी कंत्राटदार व्हीयूबी, मुंबई जॅकवेल टीमसाठी एमआयडीसीचे उपअभियंता  सुधीर सुत्रावे, जीवन दहिभाते, अलीम नाइकवाडे यांच्या प्रत्नांना यश आले.

चिकलठाणा एमआयडीसीत मिळणार २५ एमएलडी पाणी

छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी सातशे मि.मी. व्यासाची जुनाट जलवाहिनी १९८५ मध्ये टाकण्यात आली होती. कुठल्याही जलवाहिनीची पाणी वाहून नेण्याची वेगमर्यादा ही ३० वर्षापर्यंत असते. कालांतराने ती कालबाह्य होते. परिणामी गंजलेली ही जलवाहिनी बदलण्यासाठी एमआयडीसीने पाऊल उचलले.

यामुळे चिकलठाणा एमआयडीसीतील उद्योजक तसेच देवळाई म्हाडा काॅलनी, महापालिका, कमलनयन बजाज हाॅस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, विमानतळ, वळदगाव, पाटोदा, रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहत, कासलीवाल व अथर्व क्लासीक, मेल्ट्राॅन कोविड सेंटर तथा सुपरस्पेशालिस्ट रूग्णालय व इतरांचा पाणीप्रश्न येत्या महिनाभरात सुटणार आहे.  एसआयडीसीचे असे यशस्वी पाऊल पहाता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका तसेच कंत्राटदार जीव्हीपीआर कधी अठरा लाख छत्रपती संभाजीनगरकरांना पाणी पाजते, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मिळवली ३० कोटीची मंजुरी

दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र नवीन जलवाहिनीचा (फीडर लाइन) प्रस्ताव दिला होता. त्यास १० एप्रिल २०२० मध्ये मंजुरी मिळाली होती. वाळूज जलशुध्दीकरण केंद्र ते  वाल्मीगेट ते पैठणरोड ते बार्हाळे हाॅस्पीटल ते रिव्हर्डर स्कुल ते मुकुंदवाडी रेल्वे हाॅल्ट स्टेशन ते कामगार चौक ते  चिकलठाणा जलधारा हाऊसिंग सोसायटी पंप हाऊस या एकूण २० किलोमीटरच्या नवीन पाइपलाइनसाठी ३० कोटी रुपये देखील तातडीने मंजुर करून घेतले होते. 

Sambhajinagar
नाशिककरांसाठी खूशखबर; इंडिगोची एक जूनपासून 29 शहरांना विमानसेवा

मुदतीत योजनेचे काम पूर्ण

त्यानंतर याकामासाठी टेंडर काढण्यात आले होते.  यात यशस्वी झालेल्या छत्रपती संभाजीनगरातील विवेक देशपांडे यांच्या  रुद्राणी कंस्ट्रक्शन्सला हे काम  मिळाले होते. त्यानंतर अंदाजपत्रकाप्रमाणे तातडीने सदर  कामाची स्थळपाहणी करून तांत्रिक तपासणी देखील केली. प्रत्यक्षात रुद्राणी कंस्ट्रक्शन कंपनीच्या कंत्राटदाराकडून हे काम अठरा महिन्याच्या मुदतीत पूर्ण होत आहे.

निधीत होईल मोठी बचत

चिकलठाणा एमआयडीसीला वाळूज एमआयडीसीतील जलशुध्दी केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनी ३० वर्षापूर्वी टाकण्यात आलेली होती. कालबाह्य झालेली ही जलवाहिनी अत्यंत जुनी व जीर्ण झाली झाल्याने वारंवार फुटत असल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. शिवाय दरवर्षाला देखभाल दुरुस्तीसाठी दहा ते बारा लाखाचा खर्च येत असे. आता ३० कोटीच्या नव्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने एमआयडीसीच्या अनेक अडचणी दूर झाल्या

एमआयडीसीचा कुशल कारभार

वाळूज ते चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरच्या  मध्यवर्ती भागातून गेलेल्या या जलवाहिनीचे २० किलोमीटरचे अंतर आहे. सद्यस्थितीत जुन्या जलवाहिनीचा वाळूज - पैठण लिंक रोड, वाल्मी - बीड बायपास - संग्रामनगर उड्डाणपूल - चाणक्यपुरी - क्रीडा संकुल - गजानन महाराज मंदिर - जालना रोड मार्गे चिकलठाणा वसाहत असा मार्ग आहे. मात्र शहरात नव्याने झालेले सिमेंट रस्ते; जालना रस्त्याचे खोदकाम करण्याची वेळ येणार नाही यासाठी नवीन प्रस्तावात वाळूज - पैठण लिंक रोड - वाल्मी नाका - नाथ व्हॅली शाळा - सुधाकर नगर - मधुबन हॉटेल - बाळापूर फाटा ते मुकूंदवाडी जंक्शन आणि चिकलठाणा एमआयडीसी असा मार्ग प्रस्तावित केल्याने शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यांची तोडफोड वाचली.

आता मिळणार २५ एमएलडी पाणी

सध्याच्या जुनाट जलवाहिनीतून चिकलठाणा एमआयडीसीत रोज साडेसात एमएलडी पाणी मिळत आहे. त्यातून काही रुग्णालये, सरकारी कार्यालये, हॉटेल यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने दुरूस्तीसाठी वारंवार पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याने या जलवाहिनीवरील लाखो ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहेत. मात्र येत्या दोन महिन्यात नव्याने सातशे मी.मी. व्यासाची जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जाणार असल्याने थेट २५ एमएलडी पाणी मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com