छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराच्या दक्षिणेला असणाऱ्या सातारा गावातील गट क्रमांक १९५ येथील अहिल्यादेवी सार्वजनिक स्मशानभूमीची तत्कालीन ग्रामपंचायत ते नगरपरिषद आणि आत्ताचे महापालिकेच्या उदासीनतेमुळे सातारकरांना मृत्यू नंतरही ससेहोलपट चालू होती. गावातील स्मशानभूमीचीच मरणासन्न अवस्था असल्याने व तेथे कोणत्याही मुलभुत सोयीसुविधा नसल्याने मृताच्या नातेवाईकांना अनंत अडचणींवर मात करून अंत्यसंस्कार करावे लागत असत. यासंदर्भात गावातील नागरिकांनी महापालिकेकडे गेली अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर आता येथे तब्बल सव्वा दोन कोटी रूपये खर्च करून स्मशानभूमीत आठ शेड, स्मशानजोगीला कायमस्वरूपी राहण्यासाठी सुसज्ज व्यवस्था , पाण्याची टाकी, अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी अद्ययावत श्रध्दांजली शेड, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वच्छतागृह तसेच विद्युत रोषणाई व सुशोभिकरण केले जाणार आहे.
मराठवाड्यातील ही पहिली देखणी स्मशानभूमी असेल, असा दावा महापालिकेने केला आहे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच स्मशानभूमी विकसित करायचे टेंडर प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. यात वसीम कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. स्मशानभूमींच्या विकासासाठी खास शहरातील प्रसिद्ध वास्तूविशारद अजय ठाकूर ॲन्ड कंपनीची निवड करण्यात आली आहे. साताऱ्यातील अहिल्यादेवी स्मशानभूमीत कुठल्याही मुलभूत सुविधा नसल्याने तिथे मृतदेह आणताना अंधाराचा सामना करावा लागत होता. आत्तापर्यंत लोक वर्गणीतूनच सातारकर स्मशानभूमीत दिवाबत्तीची सोय तसेच स्वच्छतेची काम करत असत. स्मशानभूमीत पिण्याच्या व सांडपाण्याच्या टाकीची सोय नव्हती. श्रध्दांजली सभागृहाच्या व्यवस्था नसल्याने नागरिकांना उन्हापावसात अंत्यसंस्कार उरकल्यानंतर श्रध्दांजली अर्पण करावी लागत असे. स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्त्याचीही धड सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत होती. स्वच्छतागृहाची सोय नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणार्या नागरिकांची गैरसोय होत होती. विशेषतः महिलांना कुचंबना सोसावी लागत होती. पुरेशा प्रकाशाची सोय नसल्याने मोबाईलच्या अंधुक प्रकाशात अंत्यसंस्कार पार पाडावे लागत असत.
पावसाळ्याच्या दिवसात तर स्मशानात चिखलाचा आणि तळ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत असे. अनंत अडचणींचा सामना करत गावकऱ्यांना चिखल वाटेतून व साचलेल्या तलावातून मृतदेह काढून अंत्यविधी करावे लागत असत. पावसाळ्याच्या दिवसात अंत्यविधी ओटाच पाण्याखाली येत असल्याने तिथेच माती मुरूमाचा भराव टाकून अंत्यविधी उरकावे लागत असत. अस्थी ठेवण्यासाठी लाॅकरची सोय नसल्याने झाडाला बांधण्याची नामुष्की नागरिकांवर येत असे. अंत्यविधी शेडचे पत्रे फाटल्याने पावसाळ्यात टपटपणार्या पाण्याचा त्रास सोसावा लागत असे.गावातील स्मशानभूमीत कुठल्याही मुलभुत सोयीसुविधा नसल्याने मौजे सातारा येथील जनता त्रस्त झाली होती. या सर्व गोष्टीस प्रशासन जबाबदार आहे, अशी गावातील लोकांची तक्रार होती. प्रशासनाने हक्काच्या स्मशानभूमीत मुलभुत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि मृत्युनंतर होणारी विटंबना थांबवावी, अशी जनभावना गावातील लोकांची झाली होती. यासंदर्भात गावातील सोमिनाथ शिराने, सुभाष पारखे, रमेश बहुले, कडुबा शिराने व अन्य नागरिकांच्या पुढाकाराने अनेकदा आंदोलन झाले होते.यासर्वांची दखल घेत महापालिकेचे शहर अभियंता अविनाश देशमुख यांनी तब्बल सव्वा दोन कोटीचा निधी मंजुर केला आहे.
असे पालटणार रूपडे
या स्मशानभुमीत जाणारा मुख्य सिमेंट रस्ता गुळगुळीत करण्यात येणार आहे. स्मशानभूमित पॅव्हरब्लाक बसविण्यात येणार आहेत. भारतीय वंशाची झाडे लावून येथे घनदाड वनराई निर्माण करण्यात येणार आहे. सर्व बाजूंनी सूरक्षा भिंतीची उंची वाढवत नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. स्मशानात एलइडी पथदिवे व हायमास्ट लावले जाणार आहेत. तब्बल आठ अंत्यविधी शेड व स्त्रीया व पुरुषांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी दोन मोठे काॅक्रीटचे शेड उभारले जाणार आहेत. मुबलक पाण्यासाठी आरसीसी जलकुंभ उभारण्यात येणार आहे. शिवाय पाण्याचे हौद बांधून हातपाय धुण्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. स्मशानभूमीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. आरसीसी अंत्यविधी शेड उभारण्यात येणार असल्याने गळक्या पत्र्यांपासून नागरिकांची सुटका होणार आहे. याशिवाय स्मशानात सर्व बाजूंनी मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण करण्यात येणार असल्याने स्मशानभूमीचे रुपडे पालटणार आहे.