छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मागील दोन महिन्यांपासून सिडको एन-दोन परिसरातील सोहम मोटर्स ते कासलीवाल मार्केट दरम्यान मार्गावर पडून असलेले मातीचे ढिगारे अखेर मलनिःसारण वाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने हटवले. ऐन वर्दळीच्या मार्गावर हे ढिगारे तसेच असल्याने यावर काही दक्ष नागरीकांनी तक्रारी केल्या. "टेंडरनामाने" वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर तेव्हा कुठे यंत्रणेला जाग आली. मात्र, हे काम करताना कंत्राटदाराने दबाई न केल्याने फुटपाथवर आता मातीचा डोंगर तयार केल्याने रस्त्याचा श्वास मोकळा केला असला, तरी फुटपाथचा श्वास दाबण्याचा प्रकार केल्याने पादचाऱ्यांना वर्दळीच्या रस्त्यावर जीव मुठीत धरून वाट काढावी लागत आहे. दुसरीकडे नवीन पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला एचपीसीएल क्वार्टर ते कासलीवाल मार्केट दरम्यान माती-मुरमाचे ढिगारे रस्त्यावर तसेच ठेवल्याने रस्त्यावर वाहनतळ झाल्याने पुढे कोंडी कायम आहे.
सिडको एन-दोन मुकुंदवाडी परिसरातील सोहम मोटर्स ते कासलीवाल मार्केट दरम्यान महानगरपालिकेने तीन महिन्यांपूर्वी मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले होते. मात्र उकरलेल्या माती आणि मुरुमाचे ढीग हे ढिगारे तसेच रस्त्यावर ठेवण्यात आले. तब्बल दोन महिने ते तसेच होते. कुणीही यासाठी पुढाकार घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे येथे अपघाताचा मोठा ब्लॅक स्पाॅट तयार झाला होता. अखेर काही जागृक नागरिकांनी "टेंडरनामा"कडे तक्रार केली.
"टेंडरनामा"ने त्यावर सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध केली. सदर वृत्त समाजमाध्यमांवरून फिरले. अखेर यंत्रणेला जाग आली आणि वार्ड अभियंता मधुकर चौधरी यांच्या आदेशानंतर कंत्राटदार शितल पहाडे यांच्या पोटी कंत्राटदारांकडून ढिगारे हटविण्यात आले. मात्र या कंत्राटदाराकडून पुन्हा हलगर्जीपणा झाला. त्याने खोदाई झालेल्या नालीवर ढिगाऱ्यांची दबाई न करता जेसीबीच्या सहाय्याने ढिगारे फुटपाथवर लोटुन तेथे डोंगर तयार केला. परिणामी रस्ता मोकळा झाला असला तरी फुटपाथचा श्वास दाबल्याने आता पादचाऱ्यांने त्रासात भर टाकली आहे. दुसरीकडे नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत काम करणाऱ्या जीव्हीपीआरच्या पोट कंत्राटदाराकडून जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला. त्याचे ठिकठिकाणी माती - मुरुमाचे ढीग तसेच ठेवण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी जोड रस्त्यांची तोडफोड केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर कायम आहे.