Sambhajinagar : रस्ता रुंदीकरणासाठी दिला 18 झाडांचा बळी; संक्रांतीच्या पूर्वसंध्येला कत्तल

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकीकडे शहरांच्या प्रदूषणात वाढ होत असल्याने महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उपाययोजनांच्या नावावर टेंडर काढले. मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यात आले. बोटावर मोजण्या इतक्या चौकात कारंजे लावले.‌ त्यासोबतच व्हर्टिकल गार्डनवर उधळपट्टी दाखवत अर्धवट काम केले. दुसरीकडे शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अन् नवीन पाणी पुरवठा योजना व रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली शहराचा चेहरा-मोहरा बोडखा केला जात आहे. रस्ते रुंद व नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी शेकडो वर्ष जुनी झाडे तोडली जात आहेत. हर्सुल टी पाॅईंट ते सिडको बसस्थानक हरितपट्टा बोडखा केला जात आहे. त्यापाठोपाठ महापालिकेने जालनारोडलगत मुकुंदवाडी चौकालगत सर्व्हिस रस्ता झाडांपासून साफ ​​करण्यात आला आहे. १८ भारतीय वंशाच्या मोठ्या झाडांची कत्तल केल्याने तेथे वावरणारे पक्षांचा निवारा वाहनांवर सुसाट उडणाऱ्या मानवांसाठी धोकादायक ठरू नयेत. म्हणून तेथील झाडे तोडण्यात आली आहेत.

Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar: साताऱ्यातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कागदावरच; कारण काय?

आधीच शहराचे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोचले होते. त्यामुळे काही वर्षापूर्वी एमआयडीसी भागात नव्या कंपन्यांची परवानगी थांबविण्यात आली होती. दरम्यान हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर शहरांचे तापमान कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने महानगरपालिकेला १६ कोटी निधी दिला. त्यातून महापालिकेने छ्त्रपती संभाजीनगर शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध चौकात कांरजे सुरू केले आहेत. त्यासोबतच व्हर्टिकल गार्डन उभारले आहेत. मात्र तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या काळात झालेली ही कामे अद्याप अर्धवट स्थितीत आहेत.एकीकडे पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली अधिकारी आणि कंत्राटदार एकमेकाची झोळी भरत असताना दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. अपार्टमेंट संस्कृती वेगाने पसरू लागली आहे. सेन्सेक्सप्रमाणेच रिअल इस्टेट व्यवसायही तेजीत आहे. शहराभोवती लागवडी खालील क्षेत्र झपाट्याने कमी होत असतानाच रस्ते रूंदीकरण, नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत चांगल्या जीवंत झाडांवर कटर लाऊन कत्तल केली जात आहे.

Sambhajinagar
Navi Mumbai Airport : ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त; 'या' दिवशी होणार पहिल्या विमानाचे उड्डाण

काय आहे नेमके प्रकरण 

सिडको एन-मुकुंदवाडी चौक ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज स्मारकादरम्यान महानगरपालिका प्रशासनामार्फत रस्ता रुंदीकरण केले जात आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दिलेल्या निधीतून ७० लाख रूपये मंजुर आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून रूंदीकरण रखडले होते. महानगरपालिकेने तीन महिन्यांपूर्वी या भागातील अतिक्रमण देखील हटवले होते. "टेंडरनामा"ने येथील रखडलेल्या कामावर वाचा फोडताच अधिकार्यांना जाग आली. मात्र हे काम करीत असताना सध्याच्या रस्त्याच्या आजुबाजूला असलेली अनेक झाडे कापण्यामुळे स्थानिक व्यापारी, प्रवासी व मुकुंदवाडीतील नागरिक नाराज झाले असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर उत्तर देण्याची मागणी केली आहे.

जालनारोड मुकुंदवाडी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. दिवसरात्र येथे हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. या तुलनेत हा रस्ता अपुरा पडत चालल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा-निमित मिळालेल्या निधीचा उपयोग करत रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू केले आहे. सध्या जो जालनारोड तीस मीटरचा आहे,  त्याच्या दक्षिणेला ९ मीटर एका  बाजूने हा रस्ता वाढविला जाणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या बाजूना असलेली भारतीय वंशाची वड, पिंपळ, औदुंबर, गुलमोहर व लिंबाची झाडे नुकतीच मकर संक्रातीच्या पूर्व संध्येला मंध्यरात्री मुळासकट उखडून टाकण्यात आली. खरेतर ती टाकणे गरजेचे आहे, कारण त्याशिवाय रुंदीकरणाचे काम होऊ शकत नाही का, असे अनेक प्रश्न मुकुंदवाडीतील नागरिकांनी महानगरपालिकेपुढे उपस्थित केली आहेत. या कामासंबंधी याआधी झालेल्या आढावा बैठकीत ही झाडे काढल्यानंतर त्याबदल्यात आणखी काही झाडे लावण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, त्याचे पुढे काय झाले याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. येथील व्यापार्यांनी प्रवाशी व ग्राहकांच्या सोयीसाठी ही झाडे लावली होती. ती काढताना इतरत्र दुसरी झाडे लावली जावीत अशी अनेकांची आता मागणी होत आहे. चांगली जिवंत झाडे तोडल्याने माजी नगरसेवक भाऊसाहेब वाघ. कमलाकर जगताप, सुनिल जगताप, मोतीलाल जगताप, मनोज गांगवे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर खुलासा करावा अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा येथील व्यापार्यांनी दिला आहे. दरम्यान या रस्त्याचे रूंदीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी लोकांची इच्छा आहे. महापालिकेने यापूर्वी अतिक्रमण काढले, पण रूंदीकरण केले नाही. आता झाडे तोडली. पण  कामाला सुरुवात झाली नाही. या रस्त्याच्या कामाला गती मिळाल्यास काम अधिक वेगाने होऊ शकेल. हा रस्ता मोठा झाल्यास त्याचा मोठा फायदा लोकांना होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com