Navi Mumbai Airport : ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त; 'या' दिवशी होणार पहिल्या विमानाचे उड्डाण

Navi Mumbai Airport
Navi Mumbai AirportTendernama

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) हा मुंबई (Mumbai) आणि नवी मुंबईचाच (Navi Mumbai) नव्हे तर देशाचा गौरव असलेला एक प्रकल्प आहे. त्याचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. विमानतळ सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेवून मार्च 2025 मध्ये हे विमानतळ सुरू केले जाईल, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.

१६०० हेक्टरवर उभ्या राहत असलेल्या या प्रकल्पावर १८ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तसेच हे आंतरराष्ट्रीय विमानतळ रोड, रेल आणि मेट्रोला जोडणारे देशातील पहिले विमानतळ ठरणार आहे.

Navi Mumbai Airport
Nashik : 'त्या' 2 महिला सरपंचांच्या मालमत्तेवर का आली टाच? ग्रामसेवकालाही दणका

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी संदर्भात सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी नुकतीच मंत्री शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला भेट देवून पाहणी केली.

फेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ग्रीनफिल्ड प्रकल्पाची पायाभरणी झाली. विमानतळाच्या कामाचा दर महिन्याला आढावा घेतला जातोच, मात्र आता प्रत्यक्ष पाहणी केली. काम जोरात सुरू असून विमाने सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेवून दिलेल्या वेळेत या विमानतळावरून विमान उड्डाण होईल, असे शिंदे यांनी सांगितले.

या प्रकल्पात चार टर्मिनल असून, पहिल्या फेजमध्ये दोन रनवे सुरू केले जाणार आहेत. या विमानतळावरून दरवर्षी दोन कोटी प्रवासी प्रवास करणार आहेत. त्यादृष्टीने हे विमानतळ उभारले जाणार आहे. चारही टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यावर हॉवर क्राफ्ट, कार्गो आणि वॉटर अशा प्रकारच्या सुविधांयुक्त हे विमानतळ असेल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Navi Mumbai Airport
BMC Tender : बीएमसीचे पहिल्या टप्प्यातील नालेसफाईसाठी 70 कोटींचे टेंडर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे रोड, रेल आणि मेट्रोला जोडणारे पहिले विमानतळ आहे. या विमानतळाच्या १० किलोमीटर परिसरात मेट्रोचे जाळे असेल शिवाय मुंबई पुणे महामार्ग आणि शिवडी-न्हावाशेवा सी लिंकला जोडणारे हे विमानतळ असेल. त्यामुळे हे देशातील सर्वांत महत्वाचे विमानतळ ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशाचा ६५ वर्षाच्या काळात राज्यकर्त्यांनी 74 विमानतळ उभारले, मोदी सरकार आल्यानंतर दहा वर्षांत 75 विमानतळ उभारण्यात आले असून, येणाऱ्या सहा वर्षांत देशात दोनशेहून अधिक विमानतळ उभारण्याचा मोदी सरकारचा संकल्प असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com