छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना रोडवरील सिडको - टी पाॅईंट येथील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतरीत करण्यासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती केली असून महापालिकेने पुतळ्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सिडको टी पाॅईंट येथील रस्ता मोकळा होऊन छत्रपती संभाजीनगरवासीयांची वाहतूक कोंडीपासून लवकरच सुटका होणार आहे.
सदर काम शहरातील बालाजी कंन्सट्रक्शन कंपनीचे शीतल पहाडे यांनी - ०.४० टक्क्याने भरल्याने त्यांना हे काम देण्यात आले आहे. याकामासाठी तब्बल सव्वाकोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. सदर पुतळा सिडको बसस्थानकालगत अक्षयदीप प्लाझा इमारतीसमोरील हरितपट्ट्यात स्थलांतरीत करण्याचे काम सुरू झाले आहे.
यापूर्वी २०१४-१५ मध्ये हाॅटेल रामगिरी ते मुकुंदवाडी स्मशानभुमीपर्यंत उभारण्यात आलेल्या जळगाव टी पाॅईंट उड्डाणपुलाच्या बांधकामात नाईकांच्या पुतळ्याचा कामात अडथळा होत असल्याने पुलाचे काम सुरू झाल्यानंतर पुतळा रस्त्याच्या मध्यभागी न ठेवता रस्त्याच्या बाजुला स्थलांतरीत करण्यात आला होता. परंतु आता रस्त्याच्या मधोमध पुतळा येत असल्याने चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यावर तेथील वाहतूक कोंडी आणि प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन पुतळा स्थलांतरीत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.
यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रख्यात वास्तू विशारद धीरज देशमुख यांच्यामार्फत सविस्तर विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला होता. आता ज्या ठिकाणी पुतळा स्थलांतरीत केला जाणार आहे तेथे शहागंज प्रमाणे ऐतिहासिक लुक देणारा टाॅवर व त्यावर घड्याळाची टिकटिक वाजवली जाणार आहे. सोबतच पुतळ्याच्या अवतीभवती आकर्षक उंच चबुतरा, चहूबाजुंनी हिरवळ, सुशोभिकरण आणि विद्युत रोषणाई यासाठी तब्बल सव्वा कोटीच्या अंदाजपत्रकानुसार काम केले जाणार आहे.