
मुंबई (Mumbai) : अलिबाग तालुक्यातील घेरंड-शहापूर परिसरात सिनारमन्स कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नसताना जलवाहिनी टाकण्यासाठी काढलेली ३५६ कोटींची टेंडर रद्द करण्यात आली आहेत.
सिनारमन्स प्रकल्पासाठी एकरी ९६ लाख ६९ हजार तर हेक्टरी २ कोटी ४१ लाखांचा दर देऊ केला आहे. तर ज्यांच्या जमिनीतून ही पाईपलाईन जाणार आहे, त्या शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही. याविरोधात शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना खारेपाट विभागातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. त्यामुळे ही संपूर्ण टेंडर प्रक्रिया रद्द करुन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नव्याने प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील २८ गावांना फिल्टर पाण्याची लाईन टाकण्याच्या कामाला एमआयडीसीने तत्काळ प्रशासकीय मान्यता देत एमआयडीसी कार्यालयावर नियोजित मोर्चा रद्द करावा, अशी लेखी विनंती केली. त्यानुसार हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
कुसुंबळे विभागातून जिल्ह्यातील मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना जलवाहिनी जात असताना येथील नागरिक पाण्यापासून वंचित होते. उद्योग विभागाच्या भूमिकेला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. यासाठी अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यापूर्वी एमआयडीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या अलिबाग विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांच्याशी झालेल्या चर्चेत या मागण्या मान्य करण्यात आल्या. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण ७३६ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. तसेच प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या २८ किलोमीटर लांबीची भली मोठी पाईपलाईन टाकली जाणार आहे. यासाठी १६७ कोटी ८ लाख २५ हजार २५४ रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्याचे काम व हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे १८९ कोटी ७० लाख ३५ हजार ३२६ रुपये खर्चून जॅकवेल बांधले जाणार आहे. यासाठीची मोजणी करुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) टेंडर प्रक्रिया पूर्ण केली. हे टेंडर रद्द करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांनी सांगितले.